मुक्ताईसाठी ‘मसाका’चा बळी देण्याचे षडयंत्र- चंद्रकांत पाटील ( व्हिडीओ )

shivsena rasta roko faizpur

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । मुक्ताई साखर कारखान्यासाठी ‘मसाका’चा बळी देण्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आज केला. ते शिवसेनेच्या ‘रास्ता रोको’ आंदोलनात बोलत होते.

याबाबत वृत्त असे की, येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०१८-१९ चे ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे थकीत पेमेंट व कामगारांचे थकीत वेतन त्वरित मिळावे यासाठी बुधवारी शिवसेने तर्फे मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील बर्‍हाणपूर अंकलेश्‍वर मार्गावर सकाळी ११ वाजता ‘रास्ता रोको’ आंदोलन शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

मधुकर कारखान्याने संपलेल्या गळीत हंगामात जानेवारी पर्यंत ऊस उत्पादकांना १६००रु प्रमाणे अदा करण्यात आले. मात्र दुसरा हप्ता व फेब्रुवारी पासूनचे पूर्ण पेमेंट कारखान्याकडे थकीत आहे तसेच निवृत्त कर्मचार्‍यांचे थकीत वेतन व कामगारांचे ३० महिन्यापासून पगार थकीत आहे. या रकमा मिळण्यासाठी शिवसेनेतर्फे ‘रस्ता रोको’ करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपा नेते एकनाथराव खडसे यांचे नाव न घेता मुक्ताईनगरचा कारखाना सुरळीत चालण्यासाठी मधुकरचा बळी देण्याचा डाव आल्याचा आरोप यावेळी आंदोलनाला संबोधित करतांना केला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मधुकरची मालमत्ता ५०० कोटींची असतांना त्यांना केवळ ११ कोटी मिळविण्यासाठी जिल्हा बँकेकडे फेर्‍या मारव्या लागत आहे. तर शासनही थकहमी वेळेवर देत नाहीय ही थकहमी मिळावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्याच चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जिल्हा बँक हाय हाय च्या घोषणा देऊन निषेध करण्यात आला. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रल्हाद महाजन, मनोहर खैरनार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या रस्ता रोको आंदोलनाप्रसंगी संपर्क प्रमुख मनोहर खैरनार, यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी, कृ.उ.बा सभापती भानुदास चोपडे,शिवसेना जिल्हाउपप्रमुख प्रल्हाद महाजन, मुन्ना पाटील,यावल तालुका शिवसेना प्रमुख रवींद्र सोनवणे,रावेर तालुका शिवसेना प्रमुख योगीराज पाटील,शहर प्रमुख तथा नगरसेवक अमोल निंबाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख मिलिंद पाटील,महिला तालुका प्रमुख रजनी चौधरी, उपप्रमुख तथा माजी नगरसेवक अप्पा चौधरी, राजू काठोके,रुपाली सुनील राणे, माजी नगरसेवक जगदीश कवडीवाले, विजय मिस्त्री, युवासेना जिल्हाप्रमुख अविनाश पाटील, सागर देवांग, माजी नगरसेवक सुनील बारी यांच्या शिवसैनिक, ऊस उत्पादक ,कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी रास्ता रोको साठी फैजपुर विभागाचे पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि राहुल वाघ,स.पो.नि प्रकाश वानखेडे, यांच्या सह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मधुकरचे चेअरमन शरद महाजन, व्हा. चेअरमन भागवत पाटील व संचालक मंडळाने रस्ता रोको आंदोलनास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. यावेळी शरद महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखाना एनपीएत गेल्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यास अडचणी येता आहे त्यासाठी शासनाची थकहमी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्नशील असून थकहमी मिळताच जिल्हाबँकेडून कर्ज पुरवठा झाल्यावर शेतकर्‍यांचे व कामगारांचे देणी देण्यासाठी कारखाना कटिबद्ध असल्याचे सांगितले

कामगार युनियनचा पाठींबा

‘रास्ता रोको’ आंदोलनाला यावेळी मधुकर सहकारी साखर कारखाना कामगार युनियन तर्फे पाठींबा देण्यात आला. कामगार युनियन अध्यक्ष किरण चौधरी यांच्यासह कामगार युनियन पदाधिकारी उपस्थित होते लवकरात लवकर शासनाची थकहमी मिळावी व कामगारांचे पगार मिळावे अशी युनियन तर्फे मागणी करण्यात आली.

पहा : चंद्रकांत पाटील यांचा घणाघाती आरोप व आंदोलनाचा व्हिडीओ.

Protected Content