Home Cities यावल यावलमधील जिल्हा परिषद शाळांची सुरक्षा धोक्यात; संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराच्या मागणीला जोर

यावलमधील जिल्हा परिषद शाळांची सुरक्षा धोक्यात; संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वाराच्या मागणीला जोर


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल-सातोद-कोळवद मार्गावरील जिल्हा परिषदच्या उर्दू व मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही शाळांना संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक आणि नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वाढती वाहनांची वर्दळ, शाळेच्या मोकळ्या परिसरात होणारे अवांछित प्रकार आणि संभाव्य अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यावल येथील सातोद-कोळवद मार्गावर जिल्हा परिषदची उर्दू शाळा असून त्याच परिसरात गट शिक्षणाधिकारी कार्यालयालगत जिल्हा परिषदची मराठी शाळा देखील आहे. मात्र या दोन्ही शाळांच्या परिसराला कोणतीही संरक्षण भिंत किंवा प्रवेशद्वार नसल्याने विद्यार्थी थेट मुख्य रस्त्याच्या संपर्कात येतात. या मार्गावर नेहमीच विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत खेळताना किंवा निष्काळजीपणाने विद्यार्थी शाळेबाहेर रस्त्यावर गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पालक वर्गाने या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून “विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित केला आहे. लहान मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेभोवती संरक्षण भिंत असणे अत्यावश्यक असताना अद्यापही या शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषय असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार नसल्यामुळे रात्रीच्या वेळेस शाळेच्या परिसरात अवांछित प्रकार घडत असल्याची तक्रारही स्थानिक नागरिकांनी केली आहे. शाळेच्या मोकळ्या आवाराचा काही जण गैरवापर करत असल्याने भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शाळेचे वातावरण सुरक्षित आणि शिस्तबद्ध राहण्यासाठी परिसर संरक्षित करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

स्थानिक पालक आणि नागरिकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दोन्ही शाळांसाठी तात्काळ संरक्षण भिंती आणि प्रवेशद्वार उभारण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 


Protected Content

Play sound