अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (AADM) आणि पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाला विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांनी घ्यावयाची काळजी, प्रथमोपचार, सीपीआर तसेच विविध बचाव तंत्रांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका अनुरूपा अभिजीत भांडारकर होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. जगदीश सोनवणे, प्रा. डॉ. सागराज चव्हाण, प्रा. डॉ. अस्मिता सर्वया, प्रा. डॉ. भरत खंडागळे तसेच ग्रंथपाल उदय महाजन उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात नंदुरबार येथील आशिष वाणी यांनी ‘आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन केले. आपत्तीच्या काळात घ्यावयाची खबरदारी, उपलब्ध साधनांचा योग्य वापर आणि बचावकार्य करताना आवश्यक असलेल्या बाबी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. धुळे येथील डॉ. धनश्री साळुंखे यांनी प्रथमोपचार व CPCRचे प्रशिक्षण दिले. यावेळी रक्तस्त्राव थांबविणे, भाजलेल्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार करणे, फ्रॅक्चरच्या वेळी घ्यावयाची काळजी, विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला मदत करणे तसेच सीपीआर देण्याची योग्य पद्धत याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिके घेण्यात आली.

यासोबतच आपत्तीच्या प्रसंगी बचाव तंत्र, स्ट्रेचर तयार करणे, दोरीच्या विविध गाठी बांधणे, अग्निशमनाच्या प्राथमिक पद्धती आणि सुरक्षित स्थलांतर याबाबतही सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आणि योग्य पद्धतीने मदत करण्याचे कौशल्य आत्मसात करता आले.या प्रशिक्षणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागींची ‘डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर’ (DMV) म्हणून ओळख निर्माण होणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात आले. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण विनामूल्य असून सर्वसामान्य नागरिकांनाही यामध्ये सहभागी होता येणार आहे.
प्रशिक्षणाचे समन्वय प्रा. डॉ. अनिता खेडकर आणि प्रा. धनराज ढगे यांनी केले. ज्योती सोनार, कोमल सूर्यवंशी आणि महेश शेलार यांनी प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. या प्रशिक्षणात विद्यार्थी व प्राध्यापक मिळून एकूण ६५ जण सहभागी झाले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी वसंतसिंह बापू पाटील, डॉ. संजीवसिंह चव्हाण, डॉ. अंजली वीरा चव्हाण, स्वप्नीलसिंह मोरे, प्रशांतसिंह लगरे आणि सौ. मोनाली वीरा पाटील यांचे सहकार्य लाभले. आपत्तीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रथमोपचार, सीपीआर आणि बचाव तंत्राचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असल्याने अशा प्रशिक्षणांचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



