Home Cities यावल लालमाती आश्रमशाळेची नेत्रदीपक कामगिरी ; एकाच सोहळ्यात तीन पुरस्कारांनी गौरव

लालमाती आश्रमशाळेची नेत्रदीपक कामगिरी ; एकाच सोहळ्यात तीन पुरस्कारांनी गौरव

0
17

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रावेर तालुक्यातील लालमाती शासकीय माध्यमिक आश्रमशाळेने आपल्या यशाची नवी उंची गाठली आहे. जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या गौरव सोहळ्यात लालमाती आश्रमशाळेला एकाच वेळी तीन मानाचे पुरस्कार मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक वाटचालीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आदिवासी विकास विभाग, नाशिक अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विविध उपक्रम तसेच आदर्श कर्मचारी स्पर्धेतील गुणवंतांचा गौरव सोहळा ५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळा, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लालमाती, ता. रावेर, जि. जळगाव हिने विशेष ठसा उमटवला. ‘सुंदर माझी शाळा’ या उपक्रमात शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेला ७५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक, गौरव प्रमाणपत्र आणि आकर्षक स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

यावल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक मनेश तडवी यांनी स्वीकारला. शाळेच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल ‘सुंदर माझी शाळा’ उपक्रमातून घेण्यात आली. याच कार्यक्रमात लालमाती आश्रमशाळेतील ज्येष्ठ शिक्षक के. पी. ठाकरे यांना माध्यमिक शिक्षक गटातील ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अध्यापनातील योगदान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केलेले प्रयत्न आणि शाळेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

तसेच शाळेतील आरोग्य अधिपरिचारिका श्रीमती ललिता भारंबे यांना ‘आदर्श अधिपरिचारिका पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांनी बजावलेली जबाबदारी आणि आरोग्यविषयक उपक्रमांतील योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एका शाळेला एकाच कार्यक्रमात तीन पुरस्कार मिळणे ही लालमाती आश्रमशाळेच्या शैक्षणिक वाटचालीतील अभिमानाची बाब ठरली आहे. शाळेने केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर भर न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, विविध शैक्षणिक उपक्रम, सहशालेय उपक्रम आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची ही पावती असल्याची भावना व्यक्त होत आहे.

या गौरव सोहळ्यास यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे, प्रशांत माहुरे यांच्यासह प्रकल्प कार्यालय, यावल येथील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारताना लालमाती आश्रमशाळेच्या यशाचे विशेष कौतुक करण्यात आले. लालमाती आश्रमशाळेच्या या तिहेरी यशामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तीन पुरस्कारांच्या या यशामुळे लालमाती आश्रमशाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.


Protected Content

Play sound