
यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात भोई समाज विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अखंड भोई समाजाचे आराध्यदैवत राष्ट्रीय संत भिमा भोई महाराज यांची जयंती भक्तीभाव आणि उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील सुनमाई मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या आदरांजली कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संत भिमा भोई महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक एकात्मता आणि संतपरंपरेच्या विचारांचा जागर निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेवक सागर चौधरी, नगरसेवक उमेश फेगडे तसेच शिक्षण समिती सभापती पराग सराफ यांची उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी संत भिमा भोई महाराजांच्या विचारांना उजाळा देत समाजाला एकजुटीचा आणि सकारात्मकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय संत भिमा भोई महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजातील ज्येष्ठ मान्यवरांनी संत भिमा भोई महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांच्या उन्नतीसाठी संतांनी दिलेला संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
भोई समाज विकास व बहुउद्देशीय संस्थेच्या या उपक्रमामुळे समाजातील विविध घटक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ व्हावी, नव्या पिढीला संतांचे विचार समजावेत आणि सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थितांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांची परंपरा सातत्याने सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रगती, शिक्षणाचे महत्त्व आणि समाजातील तरुणांनी संघटितपणे पुढे येण्याची गरज यावरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. समाजातील महिलांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला.



