मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला अटक

hafiz saeed 1563348021

 

लाहोर (वृत्तसंस्था) लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. हाफिज सईद लाहोरहून गुजरांवाला येथे जात असताना दहशतवादविरोधी पथकाने त्याला अटक केली. हाफिजला अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

 

सईद व त्याच्या संघटनेविरोधात पाकिस्तानात २३ वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय दबावानंतर पंजाब पोलिसांनी अलीकडंच सईदविरोधात मनी लाँड्रिंग व दहशतवादी कारवायांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. लाहोरहून गुजरानवाला इथं जात असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. या अटकेला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे हाफिजने म्हटले आहे.

 

भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून दहशतवादविरोधी कारवायांसाठी वाढता दबाव पाहता पाकिस्तानने ही कारवाई केली. विशेष म्हणजे, हाफिजला यापूर्वीही अटक झाली होती. परंतु, काही वेळातच त्याची सुटका करण्यात आली. यानंतर पाकिस्तानने त्याला नजरकैदेत ठेवण्याचे ढोंग सुद्धा केले होते. त्यातही पाकिस्तानी सरकारने हाफिज सईदला 2008 च्या मुंबई हल्ल्यांसाठी अटक केलेली नाही. लश्कर-ए-तोयबा, जमात-उद-दावा आणि इतर कुख्यात दहशतवादी संघटनांचा संस्थापक हाफिजवर पाकिस्तानने दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याचे आरोप केले आहेत. गेल्या आठवड्यातच पाकिस्तानच्या एका न्यायालयाने हाफिजसह त्याच्या इतर 3 सहकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यातच बुधवारी त्याला अटक करण्यात आली आहे.

Protected Content