आता केज क्रिकेटची धुम : जाणून घ्या नेमका काय आहे हा प्रकार ?

cage cricket

कसोटी, एकदिवसीय आणि टि-२० नंतर आता केज क्रिकेट हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला असून याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा दुबई येथे होणार आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होणार असल्यामुळे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या क्रिकेट विश्‍वात कसोटी, एक दिवसीय आणि टि-२० हे तीन प्रकार मान्यताप्राप्त असून जगभरातील सामने आणि स्पर्धा याच प्रकारात खेळल्या जातात. अलीकडे १० षटकांचे सामने सुध्दा काही ठिकाणी खेळले जात आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आता केज क्रिकेट हा नवीन प्रकार समोर आला आहे. खरं तर २०१३ पासूनच केज क्रिकेटचे सामने हौशी पध्दतीत खेळले जात असून याची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा अल्टीमेट क्रिकेट चॅलेंज या नावाने फेब्रुवारी २०२० मध्ये दुबईत भरविण्यात आहे. यात क्रिस गेल, युवराज सिंग, आंद्रे रसेल, केव्हीन पीटरसन, शाहीद आफ्रीदी आदींसारखे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. युवराज सिंग आणि क्रिस गेल यांनी या स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे एका छायाचित्राच्या माध्यमातून जाहीर केले असून यामुळे क्रिकेट रसिकांना या नवीन फॉर्मेटची उत्सुकता लागली आहे.

केज क्रिकेट या नावातच अधोरेखीत केल्यानुसार हा पिंजर्‍यात म्हणजेच बंदिस्त जागेत खेळवण्यात येणारा प्रकार आहे. साधारणपणे क्रिकेटपटू नेट प्रॅक्टीस करतात त्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचे आयताकृती मैदान यासाठी वापरण्यात येते. यात एक सामना सहा खेळाडू खेळतात. प्रत्येकाला ३० चेंडू फलंदाजी करता येते. म्हणजे क्षेत्ररक्षण करणारा प्रत्येक खेळाडू एक षटक टाकू शकतो. यात एका फलंदाजाला पाच वेळेस बाद होण्याची मुभा आहे. अर्थात, पाच वेळेस बाद झाल्यानंतर मात्र त्याचा डाव संपुष्टात येतो. या सहा खेळाडूंमधील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज हा विजेता ठरतो. यात वापरण्यात येणारा चेंडू हा क्रिकेटच्या पारंपरीक बॉलच्या तुलनेत वजनाने हलका असतो. यामुळे यावर मोठ्या प्रमाणात फटकेबाजी करता येते. अर्थात, यामुळेच हे सामने रंगतदार होतात हे सांगणे नकोच ! तर या प्रकारासाठी अँड्रॉइड व आयओएस अ‍ॅपदेखील लाँच करण्यात आले असून यालादेखील लोकप्रियता लाभली आहे.

वास्तविक पाहता आधीपासूनच बॉक्स क्रिकेट वा इनडोअर क्रिकेट या नावाने याच्याशी साधर्म्य असणारे प्रकार अस्तित्वात आहेत. खेळ आणि मनोरंजनाची जोड याला दिलेली असल्यामुळे ते लोकप्रियदेखील झालेले आहेत. तथापि, केज क्रिकेटमध्ये प्रत्यक्ष मोठ्या मैदानावरील क्रिकेटचा थरार हा बंदीस्त जागेत अनुभवता येत असल्याने हा प्रकार बॉक्स क्रिकेटपेक्षा जास्त प्रमाणात लोकप्रिय होऊ लागला आहे. याची जागतिक पातळीवरील संघटनादेखील अस्तित्वात आली असून सर इयान बॉथम यांच्यासारखे दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू याचे अध्यक्ष असून शेन वॉर्नसारखा महान गोलंदाज या खेळाचा ब्रँड अँबेसेडर बनलेला आहे. यातच आता पैसा वसूल फटकेबाजीसाठी ख्यातप्राप्त असणार्‍या खेळाडूंच्या उपस्थितीत दुबईत स्पर्धा होत असून यात बॉलिवुडचे अनेक सेलिब्रिटी भाग घेणार असल्याने केज क्रिकेट प्रकाशझोतात येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Protected Content