
चंदीगड -वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामाचा थरार आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता ठरणार याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी , २९ मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार असून या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. एकीकडे राजस्थानला तब्बल अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्याची संधी आहे, तर दुसरीकडे गुजरात टायटन्सकडे पहिल्या क्वालिफायरमधील पराभवाची भरपाई करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे या लढतीची उत्सुकता कमालीची वाढली आहे.

गतविजेत्या बंगळुरूने पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरातवर मात करत फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबादवर दमदार विजय मिळवत क्वालिफायर-२ मध्ये धडक दिली. आता अंतिम फेरीत बंगळुरूसमोर कोणते आव्हान उभे राहणार, हे या सामन्यानंतर स्पष्ट होणार आहे. राजस्थानसाठी ही लढत प्रतिष्ठेची आहे. पहिल्या आयपीएल हंगामात विजेतेपद पटकावल्यानंतर राजस्थानला पुन्हा ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे यंदाचा मोसम त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
दरम्यान, क्रिकेट चाहत्यांमध्ये एकच प्रश्न चर्चेत आहे—जर पावसामुळे सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार? आयपीएलच्या नियमानुसार क्वालिफायर-२ साठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा परिस्थितीत सामना सुरूच होऊ शकला नाही तर पंचांकडून सुपर ओव्हरद्वारे निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र हवामानामुळे सुपर ओव्हरही घेता आली नाही, तर साखळी फेरीतील गुणतालिकेच्या आधारे अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्चित केला जाईल.
या निकषानुसार गुजरात टायटन्सला मोठा फायदा होणार आहे. साखळी फेरीत गुजरातने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले होते, तर राजस्थानने चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही आणि सुपर ओव्हरही शक्य झाली नाही, तर गुजरात टायटन्स थेट अंतिम फेरीत पोहोचेल. राजस्थानचे स्वप्न मात्र अपूर्ण राहू शकते.
हवामानाच्या अंदाजामुळेही चाहत्यांचे लक्ष चंदीगडकडे लागले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार २८ मे ते २९ मेच्या सकाळपर्यंत चंदीगड आणि आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे शुक्रवारी दिवसभर वातावरण स्वच्छ राहण्याचा अंदाज असून सामन्यावर पावसाचे सावट राहण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.



