Home क्रीडा गुजरात टायटन्सच्या बसला अचानक आग ; खेळाडूंची मध्यरात्री पळापळ

गुजरात टायटन्सच्या बसला अचानक आग ; खेळाडूंची मध्यरात्री पळापळ

0
8


अहमदाबाद-वृत्तसेवा । आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यातील पराभवाचे दुःख ताजे असतानाच गुजरात टायटन्सच्या संघावर मध्यरात्री आणखी एक मोठे संकट कोसळले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम फेरीत पराभव स्वीकारल्यानंतर हॉटेलकडे परतणाऱ्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. काही क्षणांतच बसमधून धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये खेळाडू जीव वाचवण्यासाठी बसमधून घाईघाईने बाहेर पडताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव स्वीकारावा लागला. सामन्यानंतर संघ हॉटेलच्या दिशेने रवाना झाला होता. मात्र, काही अंतर पार केल्यानंतर बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणांतच धूर बाहेर येऊ लागला. परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत बस तातडीने थांबवली.

बस थांबताच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला तत्काळ बाहेर उतरवण्यात आले. काही खेळाडू रस्त्याच्या कडेला उभे राहून परिस्थितीचा अंदाज घेत होते, तर काहींनी अधिक सुरक्षिततेसाठी रस्त्यालगतच्या झाडाझुडपांच्या दिशेने धाव घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. काही क्षणांसाठी परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. संघ व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या घटनेनंतर गुजरात टायटन्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ जवळपास तासभर रस्त्यावरच थांबले होते. त्यानंतर पर्यायी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आणि सर्वांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोणताही खेळाडू किंवा स्टाफ सदस्य जखमी झाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरात टायटन्ससाठी ही रात्र अत्यंत कठीण ठरली. एका बाजूला अंतिम सामन्यातील पराभवामुळे आयपीएल ट्रॉफीचे स्वप्न अपूर्ण राहिले, तर दुसऱ्या बाजूला बसला आग लागल्याने तणाव आणखी वाढला. अंतिम फेरीपूर्वीही संघ सततच्या प्रवासामुळे थकलेला होता. धर्मशाला, मुल्लांपूर आणि अहमदाबाद असा सलग दौरा, त्यात हवामानामुळे झालेला विलंब आणि स्पर्धेचा दबाव यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त मानसिक आणि शारीरिक ताण होता. त्यातच घडलेल्या या घटनेने संघासाठी हा दिवस आणखी आव्हानात्मक ठरला.

प्राथमिक माहितीनुसार बसला आग लागण्याचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित यंत्रणांनी घटनेची चौकशी सुरू केली असून तांत्रिक कारणांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून गुजरात टायटन्सच्या चाहत्यांकडून खेळाडू सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.


Protected Content

Play sound