
भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी गावासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी घटना नुकतीच जळगाव येथे घडली. प्रादेशिक शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य (RTO), दापोली यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात फेकरी गावाचे सुपुत्र स्वप्नील सुभाष पाटील यांचा आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव करण्यात आला. या सन्मानामुळे फेकरी गावासह संपूर्ण भुसावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्वप्नील पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन येथे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण भूषण पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य आदर्श रत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ६९ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषद सदस्य आमदार सत्यजीत तांबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सोहळ्यात फेकरी येथील महाजेनकोचे तंत्रज्ञ स्वप्नील सुभाष पाटील यांना “महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण पुरस्कार” प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असतानाही सामाजिक बांधिलकी जपत विविध जनजागृती उपक्रम, समाजोपयोगी कामे आणि लोकहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने फेकरी गावाचा सन्मान अधिक उंचावला आहे.
या कार्यक्रमात फेकरीचे पत्रकार राजेश आत्माराम निकम आणि महावितरणचे कर्मचारी किशोर भगवान सपकाळे यांनाही राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. तिन्ही मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या कामामुळे फेकरी गावाची ओळख राज्यभर पोहोचली. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे राजेश निकम, तांत्रिक क्षेत्रासोबत सामाजिक कार्यात सक्रिय असलेले स्वप्नील पाटील आणि जनसेवा व सामाजिक जबाबदारी जपणारे किशोर सपकाळे यांच्या कार्याचे यावेळी विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार किशोर दराडे, जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष अशोक जैन, रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, युवा सेना विभागीय सचिव विराज कावडिया यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सत्यजीत तांबे यांनी समाजातील शिक्षक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या व्यक्ती समाज परिवर्तनाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगितले. अशा गुणवंतांचा सन्मान हा समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून त्यातून नव्या पिढीला सकारात्मक दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले.
प्रादेशिक शिक्षक संघटनेच्या या उपक्रमामुळे राज्यभरातील अनेक गुणवंतांना व्यासपीठ मिळाले. पुरस्कार विजेत्यांचा सन्मान आणि राज्यभरातून आलेल्या शिक्षक, शिक्षणप्रेमी व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. फेकरी गावातील तिन्ही मान्यवरांना मिळालेल्या या राज्यस्तरीय गौरवामुळे गावात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन केले जात आहे.



