


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घराचे कुलूप तोडून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २३ मार्च २०२६ रोजी फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला होता. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. क्र. ८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संदीप थोरात (वय २६, व्यवसाय मजुरी) आणि कार्तिक आबा महाजन (वय २०, व्यवसाय मजुरी), दोघेही रा. एकता नगर, संजयनगर, धरणगाव तसेच एका विधिसंघर्षित बालकाचा सहभाग निष्पन्न झाला.
पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सदर घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर संदीप थोरात व कार्तिक महाजन यांना अटक करण्यात आली असून विधिसंघर्षित बालकास बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या पथकात पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ विष्णू फरे, दीपक माळी, रविंद्र पाटील तसेच पोलीस कर्मचारी ईश्वर पाटील, रावसाहेब पाटील व महेश सोमवंशी यांनी सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.



