दिल्ली -वृत्तसेवा । इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी सध्या अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. अवघ्या 15 व्या वर्षी या युवा फलंदाजाने आयपीएलच्या इतिहासात असे विक्रम नोंदवले आहेत, जे यापूर्वी कोणत्याही दिग्गज फलंदाजाला करता आले नव्हते. गुजरात टायटन्सविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात वैभवने पुन्हा एकदा आपल्या बॅटची जादू दाखवत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आणि क्रिकेटविश्वाला थक्क करून सोडले.
आयपीएलच्या 19 व्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना मुल्लांपूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. मोठ्या दबावाच्या या सामन्यात राजस्थानच्या डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमी पण तितकीच आक्रमक फलंदाजी करत केवळ 18 चेंडूंमध्ये 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभी केली. त्याच्या छोटेखानी पण प्रभावी खेळीमुळे राजस्थानला दमदार सुरुवात मिळाली.

या खेळीमधून वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मधील पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या सहा षटकांत 500 धावांचा टप्पा पार केला. आयपीएलच्या तब्बल 19 वर्षांच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी या स्पर्धेत आपला ठसा उमटवला, मात्र पॉवरप्लेमध्ये 500 धावांचा आकडा गाठण्याचा पराक्रम कोणीही करू शकले नव्हते. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. वॉर्नरने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पॉवरप्लेमध्ये 467 धावा केल्या होत्या. वैभवने तो विक्रम मोठ्या फरकाने मागे टाकत नवा इतिहास घडवला.
इतक्यावरच न थांबता वैभव सूर्यवंशीने याच सामन्यात आयपीएल 2026 मधील 700 धावांचाही टप्पा पार केला. विशेष म्हणजे, अनकॅप्ड खेळाडू म्हणून आयपीएलच्या एका हंगामात 700 धावा करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. त्याआधी राजस्थानचाच युवा स्टार यशस्वी जैस्वालने 2023 मध्ये 625 धावा करत विक्रम केला होता. मात्र वैभवने ती मर्यादा ओलांडत विक्रमांची नवी उंची गाठली आहे.
या संपूर्ण हंगामात वैभव सूर्यवंशीने 16 सामन्यांत तब्बल 711 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 47.40 इतकी प्रभावी असून स्ट्राइक रेट तब्बल 239.39 एवढा धडाकेबाज आहे. एवढ्या लहान वयात सातत्य, आत्मविश्वास आणि आक्रमकता यांचे अप्रतिम मिश्रण त्याच्या फलंदाजीत दिसून येत आहे. विरोधी गोलंदाजांसाठी तो मोठे आव्हान ठरत असून राजस्थानच्या यशामागे त्याची कामगिरी निर्णायक ठरत आहे.
वैभव सूर्यवंशीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अवघ्या 440 चेंडूंमध्ये त्याने आयपीएलमधील 1000 धावांचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वात वेगाने 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज म्हणूनही त्याने नवा मानाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या पराक्रमामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ज्ञांनी त्याच्या फलंदाजीचे भरभरून कौतुक केले आहे.
अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर सातत्याने विक्रम मोडणाऱ्या वैभव सूर्यवंशीने भारतीय क्रिकेटला एक नवा सुपरस्टार मिळाल्याची झलक दाखवून दिली आहे. त्याच्या बॅटमधून पडणाऱ्या धावांचा वेग आणि प्रत्येक सामन्यात होणारे नवे विक्रम पाहता, आगामी काळात भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी हे नाव अधिक मोठ्या अभिमानाने घेतले जाईल, अशी भावना क्रिकेटप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.



