गाडगेबाबा महाविद्यालयाचा उद्योजकता विकास केंद्राशी सामंजस्य करार

bhusaval clg

 

भुसावळ प्रतिनिधी । महाविद्यालयात भावी अभियंत्यांना स्वयंरोजगाराकडे वळविण्यासाठी शासन पुरस्कृत औरंगाबाद येथील महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासोबत भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाने आज दि. ७ सप्टेंबर रोजी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांच्या नेतृत्वाखाली सामंजस्य करार केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन दशकापासून अभियांत्रिकी क्षेत्रात विविध शाखेतून विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत रोजगार मिळाला आहे, रोजगाराबरोबर आता भावी अभियंत्यांच्या उद्योजकतेला पोषक वातावरणनिर्मिती करून उद्योजकता संस्कृती विकसित करून अभियंत्याला अधिक कौशल्य देण्याचा प्रयत्न या करारामधून होईल. तसेच उद्योग आणि उद्योजकता या दोन भिन्न बाबी आहेत. स्वभावातच उद्योजकता असलेली व्यक्ती त्याने स्वत: ठरवले तर उत्कृष्ट उद्योजक बनू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित व्हावी, असा प्रयत्न महाविद्यालय सतत करत असल्याचे प्रा.सिंह यांनी सांगितले.

उद्योगाचे नियोजन, व्यवस्थापन कसे करावे, बाजारपेठ कशी शोधावी, संबंधित उद्योग व्यवसायाचा प्रकल्प अहवाल कसा तयार करावा, निवडलेल्या उद्योगाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कुठे घ्यावे, आदी गोष्टींचे उद्योग केंद्राच्या कार्यप्रणालीत समावेश आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली कार्यरत स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचा स्वयंरोजगार आणि उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील अनुभव, तज्ज्ञ प्रशिक्षकांचा प्रस्तुत प्रकल्पाच्या अंमलबजावणीत उपयोग करून घेण्यात येतो, अशी माहिती आनंद विद्यागर यांनी दिली.

स्वाक्षरी करतांना यांची उपस्थिती
या करारावर स्वाक्षरी करतांना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र जळगाव विभागाचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्यागर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिनेश गावळे, पुण्याचे प्रकल्प अधिकारी, श्रीजित नायर, महाविद्यालयाचे ट्रेनिंग एन्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा.आय.डी. पॉल, प्रा.गिरीश भोळे, प्रा.धिरज पाटील उपस्थित होते.

Protected Content