जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय आणि हरहुन्नरी जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे 4 एप्रिल रोजी शुक्रवारी दुपारी दुःखद निधन झाले. ते 62 वर्षांचे होते. मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण मराठी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून ते विविध आजारांनी त्रस्त होते. सात-आठ वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता, त्यानंतर त्यांच्या आरोग्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम झाला. हृदयविकार आणि कावीळ यासारख्या व्याधींशी लढा देत त्यांनी पुन्हा एकदा रंगमंचावर आणि छोट्या पडद्यावर कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता.

डॉ. उजवणे यांच्या पार्थिवावर आज, शनिवार 5 एप्रिल रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी अंजली आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांवर आणि कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. विलास उजवणे यांनी ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘वादळवाट’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला होता. त्यांच्या अभिनयाची खास शैली, आणि खलनायकाच्या प्रभावी भूमिका त्यांना विशेष ओळख देऊन गेल्या. काही प्रेक्षक त्यांना सकारात्मक भूमिकांपेक्षा खलनायकाच्या भूमिकेत अधिक पसंत करत होते.

चित्रपटसृष्टीतही त्यांचा ठसा राहिला. ‘कुलस्वामिनी’ आणि ‘२६ नोव्हेंबर’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपली जादू दाखवली. आर्थिक संकटं आणि आरोग्याच्या समस्यांवर मात करत त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं, हे त्यांच्या जिद्दीचं आणि कलाविषयक निष्ठेचं प्रतीक ठरलं. डॉ. उजवणे यांचा अभिनय प्रवास म्हणजे संघर्ष, जिद्द आणि कलाविषयीची निष्ठा यांचं मूर्तिमंत उदाहरण होता. ते फक्त एक कलाकार नव्हते, तर एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी कठीण परिस्थितीतही आपल्या कलेशी इमान राखलं. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीत निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या आठवणींना उजाळा देत असंख्य चाहते आज त्यांना अश्रूपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Protected Content