Home राज्य उन्हाळ्यातच पावसाळ्याची चाहूल; राज्यात यलो अलर्ट जारी

उन्हाळ्यातच पावसाळ्याची चाहूल; राज्यात यलो अलर्ट जारी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात सध्या पश्चिम विक्षोभाच्या प्रभावासोबत अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे सक्रिय झाल्याने वातावरणात मोठा बदल झाला आहे. परिणामी, उन्हाळ्याच्या तडाख्यातच राज्यात पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने आज मंगळवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या 5 दिवसांच्या अंदाजानुसार, 20 ते 24 एप्रिलदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, पुढील दोन दिवसांत तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज आहे.

विजांचा कडकडाट होत असताना तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली, मोकळ्या जागेत, पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या आसपास उभे राहणे टाळावे. मोकळ्या जागेत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये. निवाऱ्यापासून दूर असल्यास पाय एकत्र करून खाली बसावे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने ग्रामपंचायत, पोलिस व आरोग्य विभागांना जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व सार्वजनिक इमारती तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खुल्या ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकरी बांधवांनी वादळी हवामानाच्या काळात शेतातील कामे टाळावीत. बांधकामे व मोठ्या गर्दीचे कार्यक्रम तात्पुरते स्थगित करावेत. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

एकूणच, राज्यात पुढील काही दिवस हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.


Protected Content

Play sound