…तर मोदी राष्ट्रपती अन् योगी पंतप्रधान बनणार ! : टिकैत

लखनऊ वृत्तसंस्था | भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी मोदी हे त्यांची मुदत पूर्ण होण्याआधी राजीनामा देऊन राष्ट्रपती होतील तर योगी पंतप्रधान होतील अशी खोचक भविष्यवाणी करत भाजपवर टीका केली.

भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळेच सरकारने हे तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. त्यांनी आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

टिकैत हे एका वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिकैत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांना योगी पुन्हा मुख्यमंत्री होतील का असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला खोचक पद्धतीने उत्तर देताना, अरे त्यांना पंतप्रधान बनवा हरकत नाही. हे पंतप्रधान (नरेंद्र मोदी) कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पद सोडतील आणि राष्ट्रपती बनतील. योगी नवे पंतप्रधान होतील. आपला (उत्तर) प्रदेश रिकामा होईल, येथे इतर कोणी तरी नेतृत्व करेल, असं टिकैत यांनी म्हटलं.

उत्तर प्रदेशसाठी कोणतं सरकार चांगलं असेल असा प्रश्न विचारण्यात आला असता टिकैत यांनी, आंदोलन सक्षम असेल तर येणारं सरकार कोणतंही असलं तरी ते शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करेल, असा विश्वास व्यक्त केला.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!