जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात सध्या उन्हाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेला असून, भीषण उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढत्या तापमानाचा फटका नागरिकांना बसत असून, उष्माघाताने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, आ.एकनाथराव खडसे यांनी राज्य सरकारकडे उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची आणि मृतांच्या वारसांना १० लाख रुपयांची तातडीची मदत देण्याची आग्रही मागणी केली आहे.
या संदर्भात एकनाथराव खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि मदत व पुनर्वसन मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी नमूद केले की, सरकारने स्वतः दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर न पडण्याबाबत नियमावली (SOP) जारी केली आहे. शासन ही परिस्थिती ‘गंभीर’ असल्याचे मान्य करत असताना, केवळ तांत्रिक कारणास्तव उष्माघाताचा समावेश नैसर्गिक आपत्तीत नसल्यामुळे मृतांच्या परिवाराला सरकारी मदतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.

खडसे यांनी यापूर्वीही विधिमंडळात तारांकित प्रश्न आणि औचित्याच्या मुद्द्याद्वारे या विषयावर सरकारचे लक्ष वेधले होते. आता राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही करून उष्माघाताला ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून अंतिम निर्णय होईपर्यंत, राज्य सरकारने आपल्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून किंवा विशेष निधीतून उष्माघाताने बळी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती खडसे यांनी पत्राद्वारे केली आहे. उन्हाचा वाढता तडाखा पाहता, मृतांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.



