यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावात एक अत्यंत दुःखद घटना समोर आली असून, २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या दुर्देवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणाची ओळख निलेश अशोक बडगुजर (वय २८) अशी पटली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलेश हा चिंचोली येथे आपल्या वयोवृद्ध आईसोबत राहत होता आणि शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. दोन विवाहित बहिणींचा तो एकुलता एक भाऊ असल्याने कुटुंबाचा मोठा आधार होता. २० एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि यावल पोलिसांना घटनेची सूचना दिली. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. मात्र, निलेशने इतके टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. यावल पोलीस पुढील तपास करत आहेत.




