भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. तालुक्यातील तीन एमआयडीसी परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल फोन असा एकूण ७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०२४ नंतर भुसावळमध्ये यंदा करण्यात आलेली ही सर्वात मोठी एमडीविरोधी कारवाई असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन राईज’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती केल्यानंतर आता अमली पदार्थांचे सेवन करणारे तसेच त्यांची विक्री आणि पुरवठा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन एमआयडीसी परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी संशयित चार इसमांकडून ६५ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. याशिवाय अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित असल्याच्या संशयावरून दोन मोटारसायकली आणि चार मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले. या संपूर्ण कारवाईत ७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणी ऋषभ खेडकर, प्रथमेश आव्हाड, शेख रहेमतुल्ला आणि अजगर खान या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८, २२ आणि २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय चाटे करीत आहेत. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा स्रोत, त्याचा पुरवठा कोणाकडून केला जात होता तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचे समजते. दरम्यान, ऑपरेशन राईजच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुणाईला दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष कारवाईवरही भर दिला आहे. भुसावळमधील या मोठ्या कारवाईमुळे अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा अवैध व्यवहारांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.



