Home क्राईम कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना अनोखी भेट! १.७५ लाखांचे १० गहाळ मोबाईल मूळ...

कासोदा पोलिसांची दिवाळीपूर्वी नागरिकांना अनोखी भेट! १.७५ लाखांचे १० गहाळ मोबाईल मूळ मालकांना परत

0
2

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कासोदा पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. CEIR पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गहाळ झालेले १० मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. अनेक दिवसांपासून मोबाईल परत मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर मोबाईल मिळताच आनंद फुलला.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नागरिकांचे हरविलेले व गहाळ झालेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलचा वापर तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या निर्देशानुसार कासोदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपासाला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महिला पोलीस अंमलदार आरती हापसे यांनी CEIR पोर्टल आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एकूण १० गहाळ मोबाईल फोन शोधून हस्तगत केले. या मोबाईलची अंदाजे किंमत १ लाख ७५ हजार रुपये असून, सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले.

विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या तोंडावर अनेक दिवसांपासून आपले मोबाईल परत मिळण्याची आशा सोडून बसलेल्या नागरिकांना अचानक मोबाईल परत मिळाल्याने मोठा आनंद झाला. सणापूर्वीच हरविलेली वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी कासोदा पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले. पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट मिळाली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस अंमलदार आरती हापसे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.


Protected Content

Play sound