आ. रत्नाकर गुट्टे यांची मालमत्ता ईडीच्या ताब्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड येथील आमदार रत्नाकर गुट्टे यांची सुमारे २५५ कोटींची मालमत्ता जप्त केल्याने कळबळ उडाली आहे.

ईडीने राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांची जप्त केलेली मालमत्ता ताब्यात घेतली आहे. ताब्यात घेण्यात आलेली ही मालमत्ता यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये गुट्टे यांच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लॉंड्रिंग प्रकरणासंदर्भात ईडीने जप्त केली होती. ताब्यात घेतलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे २५५ कोटी रुपये आहे.

गुट्टे यांच्यावर ईडीने ६३५ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये त्यांनी विविध गरीब शेतकर्‍यांच्या नावे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची फसवणूक केली होती. घेतलेले कर्ज एका योजनेंतर्गत होते. ज्यामध्ये बँकांनी ऊस लागवड करणार्‍या शेतकर्‍यांना शेतीसाठी उपकरणे, बियाणे, खते, ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कर्ज दिले होते.

गुट्टे यांनी इतर काही जणांसोबत मिळून शेतकर्‍यांच्या कागदपत्रांचा वापर करून गंगाखेड शुगर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज काढले आणि तब्बल ६३५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बँकांकडून घेतलेली कर्जे २०१२-१३ आणि २०१६-१७ दरम्यान होती. ही कर्जे वितरीत झाल्यानंतर गंगाखेड शुगरद्वारे इतर विविध खात्यांमध्ये वळती करण्यात आली. ज्या शेतकर्‍यांच्या नावाने कर्ज काढले होते, त्यांना कधीच ते कर्ज मिळाले नाहीत.

न्यायालयाच्या परवानगीनंतर आता ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये गंगाखेड साखर कारखाना आणि २४७ कोटी किमतीची यंत्रसामग्री, इतर तीन संलग्न कंपन्यांची सुमारे ५ कोटी रुपयांची जमीन आणि डिसेंबर २०२० मध्ये यापूर्वी जप्त करण्यात आलेल्या काही मालमत्तांचा समावेश आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!