तरूणाचा खून करणाऱ्या तिसऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात मुलीसोबत बोलत असल्याचा रागातून सागर रमेश पालवे (वय-२५) रा. मालदभाडी ता. जामनेर या तरुणाला मारहाण करून खून केल्याची घटना गुरूवारी ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती. तर तिसऱ्या फरार आरोपी चालक रतन पंडीत माळी रा. मुक्ताईनगर याला पोलीसांनी मुक्ताईनगर येथून रविवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता अटक केली आहे.

याबाबत अधिक असे की, एमआयडीसी परिसरातील नवीन गुरांचा बाजार परिसरातील एका ट्रान्सपोर्ट येथे सागर रमेश पालवे  हा दोन वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता. गुरुवार ७ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेदरम्यान ट्रान्सपोर्टवर असताना त्याच ठिकाणी चालक म्हणून काम करणारे यापुर्वी ज्ञानेश्वर उर्फ पिंटू बिजलाल बोदडे (४०, रा. मुक्ताईनगर), नीलेश रोहिदास गुळवे (२२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) आणि  रतन पंडीत माळी रा. मुक्ताईनगर या तिघांनी राहत्या खोलीमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली होती. यात सागरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत सागरची आई  नीलम रमेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात शनिवारी ९ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता एमआयडीसी पोलिसांनी माहिती काढून ज्ञानेश्वरला मुक्ताईनगर येथून तर नीलेश गुळवे यास रामेश्वर कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्यानंतर तिसरा फरार संशयित आरोपी रतन पंडीत माळी रा. मुक्ताईनगर याला देखील रविवारी १० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता  अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. तिघांना मंगळवार १२ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Protected Content