पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । माकडाच्या पिल्लांसह आई पाण्याच्या शोधात भटकत असतांना विहिरीत पडली. मात्र, वनविभागाने त्यांची सुटका केली आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील सुनसगाव खुर्द येथे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली.
चैत्राचे आगमन झाले असून उन्हाच्या झळा जाणवायला सुरुवात झाली आहे . शेत शिवारात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यजीवांची भटकंती होत आहे . अशाच पाण्याच्या शोधार्थ माकडाचे पिल्लू आणि त्याची आई काल सायंकाळी सुनसगाव खुर्द येथील शेतकरी माधव पुंजाजी धनगर यांच्या शेतातील विहीरीत पडली.
शेतकरी आणि गावकऱ्यांनी माकडाच्या पिल्लाला व त्याच्या आईला काढण्याचा रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केला .खाटेला दोर बांधून विहिरीत सोडले. मात्र शेतकऱ्यांना विहीरीत पडलेले पिल्लू आणि आईला बाहेर काढण्यात यश आले नाही. अखेर पोलीस पाटील गणेश पाटील यांनी वन विभागाशी संपर्क केला. सकाळी ६ वाजता वनक्षेत्रपाल समाधान पाटील, वनपाल संदीप पाटील, वन कर्मचारी जीवन पाटील
,आनंदा ठाकरे, ईश्वर पारधी, भूरा जोगी, गोपाल पाटील, सुनील पालवे यांनी पिंजरा लावून अथक परिश्रमाने माकडाचे प्राण वाचवले. त्यांना जीवदान दिल्याबद्दल पोलीस पाटील गणेश पाटील यांच्यासह शेतकरी आणि गावकऱ्यांनी वन विभागाचे अभिनंदन केले. माकडाचे पिल्लू आणि त्याच्या आईला नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.