पहूर ग्रामीण रूग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली भेट

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर ग्रामीण रुग्णालयात कोवीड लसीकरणाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून आतापर्यंत १,०१९ नागरीकांनी लसीकरण करून घेतले आहे. आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांनी ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील गैरसोयी तसेच खाजगी रुग्णालयात रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांबाबत सखोल आढावा घेतला.

पहूर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता .तसेच लसीकरणाचा डोसही संपलेला होता . डॉ . जितेंद्र वानखेडे हे उपलब्ध तोकड्या मनुष्यबळ आणि सुविधांच्या माध्यमातून रुग्णसेवा करीत आहेत .  पहूर ग्रामीण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही पाहिजे त्या सुविधा आणि वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या .  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांनी तातडीने डॉ . संदीप कुमावत यांना नियुक्तीचे आदेश दिले .  बंद असलेला लँडलाईन दुरध्वनी सुरू करण्याचे आदेश दिले .  यावेळी त्यांनी जनरेटरची पाहणी केली . जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन केले .याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ . हर्षल चांदा ,वैद्यकीय अधिकारी डॉ . जितेंद्र वानखेडे ,  सरपंच पती रामेश्वर पाटील , उपसरपंच राजू जाधव ,  संतोष पाटील , समाधान पाटील ,मनोज जोशी , चेतन रोकडे आदींसह कर्मचारी उपस्थित होते .

खाजगी दवाखान्याची झाडाझडती –

पहूर कसबे येथील खाजगी दवाखान्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शनची परवानगी नसताना वापर  केल्याबद्दल बजावण्यात आलेल्या नोटिशीला उत्तर न दिल्याने आज बुधवारी सकाळी थेट जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी संबंधित दवाखान्याची झाडाझडती करून संबंधीत वैद्यकीय व्यवसायीकांना आवश्यक त्या सूचना दिल्या .खासगी डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार न करता त्यांना चाचणी करण्यासाठी मार्गदर्शन  करण्याचे आवाहन त्यांनी केले .तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांची अंमलबजावणी करावी .उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला . काही वैद्यकीय व्यावसायिक रुग्णांकडून अवाजवी बिले वसूल करत असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत .

 

 

Protected Content