सव्वा कोटी घेतल्या प्रकरणी गिरीश महाजनांनी भूमिका स्पष्ट करावी- दिलीप तिवारी

जळगाव प्रतिनिधी । माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वॉटरग्रेसला ठेका देण्यासाठी सव्वा कोटी घेतल्याचे बोलले जात असून याबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

ज्येेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी हे महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराविषयी सोशल मीडियातून सातत्याने आवाज उठवत असतात. या अनुषंगाने त्यांनी आज सकाळी फेसबुक पोस्ट शेअर केली असून ती सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. यात त्यांनी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वॉटरग्रेसला ठेका देण्यासाठी सव्वा कोटी घेतल्याचे बोलले जात असून याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. वॉटरग्रेस ही कंपनी काळ्या यादीत असतांनाही याच कंपनीला जळगावातील कचरा संकलीत करण्याचा पाच वर्षांसाठी ठेका दिला गेला तेव्हाच यात काही तरी काळेबेरे असल्याची चर्चा रंगली होती. अलीकडच्या काळात तर वॉटरग्रेसने जळगावकरांना वेठीस धरण्यास प्रारंभ केल्यानंतर या चर्चेला रंग चढला आहे. यात काही मंडळीने पैसे घेऊन वॉटरग्रेसचे भूत जळगावकरांच्या मानगुटीवर बसविले असल्याचा आरोप करून जनता मोठ्या प्रमाणात संतप्त झालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी दिलीप तिवारी यांनी गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

दिलीप तिवारी यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी देत आहोत.

ते नगरसेवक कशासाठी आले होते?

जळगाव शहरातील सफाईचे काम करण्यात अकार्यक्षम ठरलेल्या वॉटरग्रेसला वाचविण्यासाठी भ्रष्ट मंडळींची साखळी कार्यरत झाली आहे. या मंडळींना पडद्यामागून मार्गदर्शन करणारे कोणी तरी नक्कीच आहे. महापौरपदी भारती सोनवणे विराजमान झाल्यानंतर त्यांचे पती व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे सक्रिय झाले आहेत. प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून काम कसे करुन घ्यावे ? याची निश्‍चित अशी हातोटी सोनवणेंकडे आहे. सभेत मुद्द्यांवर बोलणारा हा माणूस वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरतो. त्यामुळे वॉटरग्रेसच्या आडून सोनवणेंना निष्प्रभ करण्याचा डाव काही मंडळींनी रचला आहे. त्याचाच पहिला भाग म्हणून सोनवणे यांच्या विरोधात सरकारी कामकाजात अडथळ्याची तक्रार पोलिसात पोहचली.

मनपा उपायुक्त जर सरकारी काम करायाला पहाटे सहा वाजता आले होते, तर मनपाचे स्वीकृत नगरसेवक सोनवणे पहाटे सहाला तेथेच गोट्या खेळायला आले होते का ? उपायुक्त जर सरकारी आहे तर स्थायी समिती सभापती व सोबतचे इतर तीन-चार नगरसेवक काय गैरसरकारी आहेत ? वॉटरग्रेसचा ठेका बंद करा म्हणून आमदार विधानसभेत बोलत आहेत, मनपाच्या सभेत २ वेळा तसा ठराव होतो आहे, वृत्तपत्रे कचर्‍याचे फोटो छापत आहेत. कैलास सोनवणे यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून इतर ठेकेदाराकडून सफाईसाठी घंटागाडी चालक व कामगार उपलब्ध केले आहेत. हे सारे सारे जळगावकरांना माहिती आहे, दिसते आहे. अशा स्थितीत वाहने व कर्मचाऱ्यांची सूत्रे पुन्हा वॉटरग्रेसकडे द्या, असा उपायुक्तांचा आग्रह हा सरकारी कामाचा भाग असू शकतो ? उपायुक्तांनी अशा प्रकारे अती विशेष सरकारी काम करण्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेऊन, वॉटरग्रेसला पाठीशी कशासाठी घालत आहात ? याचा खुलासा करायला हवा.

वॉटरग्रेसच्या थाळीत कोणाकोणाची भागिदारी आहे ? हे जळगावकरांच्या समोर यायला हवे. यापूर्वी मी स्वतःच लिहिले आहे की, माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वॉटरग्रेसला ठेका देण्यासाठी सव्वा कोटी रुपये घेतले असे बोलले जाते. जे बोलले जाते त्यात बदनामी होत असेल तर महाजन यांनी बोलायला हवे. जळगाव शहराचा एका वर्षात विकास करतो, हे महाजनच बोलले होते ना ? आता कुठे आहेत महाजन ?

आमदार सुरेश भोळे यांनीही थेट विधानसभेत म्हटले आहे की, वॉटरग्रेसला वाचविण्याचा प्रयत्न काही अधिकारी करीत आहेत. कोण आहेत ते अधिकारी ? भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने वॉटरग्रेसला ठेका देण्याची फाईल क्लियर करायला ५ लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. चर्चा म्हणजे बदनामी नसली तरी खुलासे वेळीच व्हायला हवेत. याशिवाय, दोन दिवसांपूर्वी पहाटे जेव्हा सोनवणे आणि उपायुक्तांचा वाद झाला तेव्हा तेथे स्थायी समिती सभापतींसह इतरही दोन-तीन नगरसेवक उपस्थित होते. हे नगरसेवक केवळ बघे होते की, विशिष्ट हेतूने आले होते ? याबाबत स्थायी समिती सभापतींचे पतीराज म्हणतात, मआम्ही वॉटरग्रेसला अगोदरच विरोध केला आहे. सोनवणे यांनी मला बोलावले होते. पण मी जाऊ शकलो नाही. तेथे सभापती गेले.फ इतर दोघे-तिघे नगरसेवक तेथे कशासाठी आले होते ? याचा खुलासा त्यांनी केलेला नाही. इतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना स्पष्टीकरण विचारलेले नाही. उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे यांनीही वेळोवेळी वॉटरग्रेसवर ताशेरे ओढले असून आपली विरोधाची भूमिका स्पष्ट केली आहे.

जळगावकरांना वॉटरग्रेसचा संपूर्ण खेळ समजतो आहे. पाच लाख जळगावकरांना वेठीस धरणार्‍या वॉटरग्रेसला पळवून लावण्याचे धाडस सत्ताधारी भाजपच्या ५७ नगरसेवकांनी करायला हवे. पण त्यांची अवस्था थांबावे कोणत्या गटात, मुक्ताईनगरच्या भाऊच्या गटात, जामनेरच्या भाऊच्या गटात, आमदाराच्या गटात, सोनवणे समर्थकांच्या गटात, सदा-कदा नाराजांच्या गटात की सत्ता बाह्य केंद्र मानले जाणार्‍या बिल्डर लॉबीच्या गटात ? अशी विभाजीत झालेली आहे. सत्ता असून, जाब विचारण्याची धमक असून भाजपचे संख्याबळ हताश व निराश झालेले दिसते. भाजपला नाकर्ते बहुमत दिल्याचा पश्‍चाताप जळगावकर करीत आहेत. अशा वातावरणात जळगावकरांच्या प्रश्‍नासाठी कैलास सोनवणे जर अरेरावीची भाषा वापरत असतील तर मूळ स्वभाव असलेला जळगावकर टाळी वाजवेल आणि सोनवणेंच्या सुरात सूर मिळवून अरे रावीचे समर्थन करेल. वॉटरग्रेस सफाई करण्यात अकार्यक्षम ठरलेली असताना तिला पाठिशी घालणार्‍यांच्या तोंडाला काळे फासायला हवे. ती वेळही लवकरच येईल असे दिसते.

दिलीप तिवारी

(भाजपला मत देऊन पस्तावणारा जळगावकर)

(शेवटी नेहमीचाच इशारा – बदनामी वाटत असेल तर दावा कर, गुन्हा दाखल कर भौ)

दिलीप तिवारी यांच्या मूळ फेसबुक पोस्टची लिंक :

Protected Content