भुसावळात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार; दोघांविरूध्द गुन्हा (Video)

भुसावळ प्रतिनिधी । सर्वत्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असतांना शहरातील ओम पॅथॉलॉजी लॅबमध्ये आज पाच इंजेक्शन जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करत संबंधीत लॅब सील करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून याची अनेक ठिकाणी वाढील किंमतीत विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेता, आता जिल्ह्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वितरणाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने ताब्यात घेतली आहे. परिणामी आता रेमडेसिवीर इंजेक्शनचे वितरण हे फक्त शासकीय प्रणालीतून होत आहे. मात्र असे असतांनाही काही जण याचा काळाबाजार करत असून आज भुसावळात अशीच घटना घडली आहे.

बद्री प्लॉटमधील ओम पॅथॉलॉजीमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथून आधी इंजेक्शन घेतलेल्या नागरिकानेच ही गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला दिली. यानुसार आज पोलिसांनी सापळा रचून छापा मारला.

या छाप्यामध्ये ५४०० रुपयाला मिळणारे शंभर एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन व ३४०० रुपयाला मिळणारे रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. तसेच पोलिसांना एक फुटलेले इंजेक्शन आढळले. संबंधीत लॅब चालकाने कमी मूल्यात इंजेक्शन घेऊन याची वाढीव दरात विक्री केल्याचे आढळून आले. या अनुषंगाने पोलिसांनी लॅबचालक विशाल शरद झोपे (वय २८, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (वय १८, मानमोडी, ता. बोदवड) यांना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर, ओम पॅथॉलॉजी लॅबली पालिका प्रशासनाने सील केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात फूड अँड ड्रग निरीक्षक अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ, ईश्‍वर भालेराव, सचिन पोळ आदींच्या पथकाने केली.

Protected Content