पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने शासकीय रूग्णालयांसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर

*जळगाव, प्रतिनिधी* | राज्यात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून जिल्हा प्रशासन याच्या प्रतिकारासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून शासकीय रूग्णालयांमधील अग्नीशामन यंत्रणेसाठी ६ कोटी ५० लाखाचा निधी मंजूर झाला आहे.

महाराष्ट्रात ओमायक्रॉन रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर याला परतून लावण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत आणि स्वयंचलीत अग्नीशामन यंत्रणा उभारण्यासाठी ६ कोटी ५० लक्ष १८ हजार ४९९ रूपयांचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ३ उपजिल्हा, १७ ग्रामीण, एक कुटीर व २ ट्रामा केअर सेंटर अशा एकुण २३ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शार्ट सर्कीट अथवा कोणत्याही कारणांनी आग लागण्यावर या स्वयंचलीत यंत्रणेच्या मदतीने आळा घालणे सहज शक्य होणार आहे. राज्यातील अनेक रूग्णालयांमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्‍वभूमिवर, या यंत्रणेमुळे रूग्णालयांमधील वैद्यकीय सुविधेला अग्नीविरोधी अभेद्य कवच यामुळे प्राप्त होणार आहे.*

राज्यात अनेक ठिकाणी रूग्णालयांना लागलेल्या आगीत अनेकांचे बळी गेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, शासकीय रूग्णालयांमध्ये अद्ययावत अग्नीशामन यंत्रणा असावा यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी स्वयंचलीत यंत्रणा उभारण्यासाठी निर्देश दिले होते. या पार्श्‍वभूमिवर, जिल्हयातील जिल्हा रुग्णालयासह अधिपत्याखालील सर्व तालुक्यातील ३ उपजिल्हा, १७ ग्रामीण, १ कुटीर व २ ट्रामा केअर सेंटर अशा एकुण २३ रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा उभारणी करणेसाठी प्रस्तावित केल्यामुळे जिल्हा वार्षिक योजना सन २०२१ – २२ मधुन रु. ६,५०,१८,४९९/- अक्षरी ६ कोटी ५० लक्ष १८ हजार ४९२ मात्र एवढया रक्कमेस प्रशासकिय मंजुरीचे आदेश   जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नुकतेच निर्गमीत करण्यात आले आहेत. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (विद्युत) विभाग धुळे यांचे कार्यालयाकडून पुढील कार्यवाही करण्यात येऊन जिल्हयातील सर्व शासकिय रुग्णालयांमध्ये लवकरच अग्निशमन यंत्रणा उभारणी करण्यात येणार आहे.

या निधीच्या माध्यमातून स्वयंचलीत अग्नीशामन यंत्रणा उभारण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोणत्याही भागात अचानक आग लागल्यास लिक्वीड सेंन्सर हिट होऊन ऍटोमॅटीक स्प्रिंकलर सिस्टीमद्वारे (पाण्याचे फवारे) सुरु होऊन आग आटोक्यात आणली जाते. यासोबत यामध्ये असणार्‍या ऍटोमॅटीक स्मोक डिटेक्शन सिस्टीम असल्याने रूग्णालयाच्या इमारतीमध्ये कोणत्याही भागात शॉर्टसर्किटने धुर निघाल्यास अचुक ठिकाण शोधुन त्याठिकाणचे सेन्सर कार्यान्वीत होऊन स्प्रिंकलर (पाण्याचे फवारे) सुरु होऊन आग विझवण्यास मदत होते. तसेच आग लागल्यास फायर अलार्म सिस्टीम द्वारे त्याठिकाणचे सेन्सर त्वरीत कार्यान्वीत होऊन आग लागल्याची सुचना अलार्म (घंटा) वाजवुन दिली जाते.त्यामुळे वेळीच रुग्णालयाचे इमारतीमधील रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व रुग्णालयीन स्टाफ यांना याबाबत माहिती प्राप्त होऊन ते सजग होतात. यासोबत आग लागताच  पब्लीक ऍड्रेस सिस्टीमच्या माध्यमातून याची माईकद्वारे तात्काळ माहिती दिली जाणार आहे. यासोबत फायर हायड्रंट सिस्टीममध्ये असणारे सेंन्सर त्वरीत कार्यान्वीत होऊन ऍटोमॅटीक पंप सिस्टीम द्वारे आपोआप पाण्याचे फवारे सुरु होऊन त्या ठिकाणी आग विझवण्यास मदत होते. याव्यतीरीक्त संपुर्ण रुग्णालयाचे इमारतीमधील आतल्या व बाहेरील बाजुस पाण्याची पाईपलाईन बसविण्यात येणार असुन रुग्णालयाचे इमारतीमधील चारही बाजुने आतल्या भिंतीवर आवश्यक त्या ठिकाणी फायरइस्टींगयुशर (आग विझवण्यासाठी असलेल्या गॅसच्या हंडया) बसविण्यात येणार आहेत. या प्रणालीमुळे भविष्यात कोणत्याही कारणाने आग लागल्यास यावर तात्काळ नियंत्रण मिळविणे सोपे होणार आहे.

*या  रुग्णालयात असा मिळणार निधी !*

मुक्ताईनगर  (१ कोटी  ३३ लक्ष ६६ हजार ), पाचोरा ( ९ लक्ष २५ हजार ) , पिंपळगाव हरेश्वर ( ९ लक्ष ४६ हजार ), चाळीसगाव (५८ लक्ष १७ हजार ), मेहुणबारे ( ९ लक्ष ४८  हजार ) , भडगाव ( ९ लक्ष ३८ हजार ) , पहूर  ( ९ लक्ष ५५ हजार ) , जामनेर  (५६ लक्ष ९२ हजार ) , वरणगाव ( ११ लक्ष ४९ हजार ) , बोदवड ( ९ लक्ष ४७हजार ) , रावेर (११ लक्ष ६० हजार ) , पाल ( ९ लक्ष २९ हजार सावदा  (४३ हजार ), यावल ( ९ लक्ष ५६ हजार ) , न्हावी  ( ९ लक्ष २५ हजार ) , , भडगाव ( ९ लक्ष ३८ हजार ) , अमळनेर  ( ५६ लक्ष ९० हजार ), अमळगाव (९ लक्ष ३३ हजार ), चोपडा  (८३ लक्ष ०४ हजार ), धरणगाव (९ लक्ष ४३ हजार ), एरंडोल  (९ लक्ष ४५ हजार ), अमळगाव (९ लक्ष ३३ हजार ), पारोळा ( १० लक्ष १७ हजार ) , भुसावळ (५८ लक्ष १७ हजार ), भुसावळ – ट्रामा केअर बिल्डींग  (५६ लक्ष ९१ हजार ) अशा एकूण ५ कोटी ५० लक्ष १८ हजार ४९९ रु. इतक्या रकमेस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी नुकतीच  प्रशाकीय मान्यता दिलेली  आहे.

Protected Content