सबॉर्डिनेट इंजिनिअर्स विविध मागण्यांसाठी आक्रमक; ६ सप्टेंबरला काम बंद

खामगाव प्रतिनिधी । महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही कंपनीतील सबॉर्डिनेट अभियंते मागील अनेक वर्षांपासून विविध मागण्यांसाठी प्रशासनासोबत पाठपुरावा करीत आहेत. परंतु प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने प्रशासनास जागे करण्यासाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमधील सर्व अभियंत्यांनी (दि.२३) पासून आंदोलनाला सुरुवात केली आहे.

महापारेषण कंपनी प्रशासनामार्फत स्टाफ सेटअपच्या नावाखाली अभियंत्यांची पदे कमी करण्याचा, महावितरणमार्फत कम्पलसरी व्हॅकन्सी (CV) च्या नावाखाली रिक्त पदे न भरणे, महानिर्मितीमधील फॅक्टरी अलाउन्स लागू न करण्याचा घाट घातलेला आहे. सदर विषयात संघटनेने मागील २ वर्षांपासून प्रशासनासोबत चर्चा करुन लेखी निवेदन देखील दिलेले आहे. तरीदेखील तीनही कंपनीच्या प्रशासनाने संघटनेला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय लादलेला आहे म्हणून राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याची वेळ आलेली आहे असे संघटनेचे विभागीय  अध्यक्ष अभिजित बोळे  यांनी खामगाव येथील द्वारसभेला संबोधित करतांना म्हटले. महापारेषणमधील अन्यायकारक स्टाफ सेटअपमुळे ५०७ उपकार्यकारी अभियंता तसेच १४० अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांची पदे कमी होणार आहेत. महावितरणमधील कम्पलसरी व्हॅकन्सी (CV) मुळे अभियंत्यांवर कामाचा प्रचंड अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे स्वास्थ्यावर परिणाम होऊन अभियंते व्याधिग्रस्त होत आहेत. अशी माहिती   विभागीय  सचिव अजय गावंडे यांनी दिली . यावेळी  महावितरणचे अभियंते श्री महाजन,अजय मोहता ,दिलीप वक्ते,पंकज मिश्रा, थाटे, शैलेश आखरे ,राठोड, पाटिल, शर्मा मॅडम यांच्यसह  अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

प्रमुख मागण्या :- 

१) महापारेषण मधील स्टाफ सेटअप लागू न करणे.

२) महावितरण मधील CV अर्थात कम्पलसरी व्हॅकन्सी (अनिवार्य रिक्त पदे) धोरण रद्द करणे

३) महानिर्मिती मधील फॅक्टरी अलाउन्स लागू करणे.

४) महापारेषण मध्ये २०१५ पासून तसेच महावितरण व महानिर्मिती मध्ये २ वर्षांपासून न झालेल्या पदोन्नती त्वरीत करणे.

५) एकतर्फी लागू केलेले सेवा विनियम व बदली धोरण रद्द करणे.

६) नवीन पद भरती ताबडतोब करणे.

आंदोलनाचे टप्पे:- 

१) दि. २० ऑगस्ट पासून कार्यालयीन वेळेव्यतिरीक्त वेळेत इतर कोणत्याही प्रकारची कामे न करणे.

२) शासकीय तसेच साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वरिष्ठांच्या दबावाला बळी न पडता काम न करणे.

३) दि. २४ ऑगस्ट पासून अतिरिक्त पदभार असलेल्या सर्वांनी अतिरिक्त पदभार सोडणे.

४) दि. २३, २६, ३० ऑगस्ट व दि. ३ सप्टेंबर रोजी सर्व परिमंडळ, मंडळ व विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन निषेध नोंदविणे.

५) दि. २५ ऑगस्ट पासून सर्व कार्यालयीन WhatsApp गृप सोडणे.

६) दि. ०६ सप्टेंबरला काम बंद आंदोलन करणे.

Protected Content