मुंबई-वृत्तसेवा । राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी आणि अभिनव योजना जाहीर केली असून, आता राज्यातील प्रमुख महामार्ग व रस्त्यांवरील टोल नाक्यांच्या परिसरात ‘कृषी मॉल’ उभारले जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी थेट बाजारपेठ उपलब्ध होणार असून, ग्राहकांनाही ताजा आणि दर्जेदार माल थेट शेतातून मिळणार आहे.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला माल कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा शहरांमध्ये विक्रीसाठी नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च आणि वेळ खर्च करावा लागतो. अनेकदा या प्रक्रियेत शेतकऱ्यांचा नफा कमी होतो. मात्र, टोल नाक्यांवरच विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताजवळच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे वाहतूक खर्चात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या कृषी मॉल्सचा फायदा ग्राहकांनाही होणार आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना आता थेट शेतकऱ्यांकडून ताजी फळे, भाजीपाला आणि अन्य कृषी उत्पादने खरेदी करता येणार आहेत. मध्यस्थांचा हस्तक्षेप नसल्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत येथे शेतमाल स्वस्त दरात मिळण्याची शक्यता असून, ग्राहकांना ‘स्वस्त आणि मस्त’ खरेदीचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
यापूर्वी राज्यात ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ या संकल्पनेवर आधारित आठवडी बाजारांचा प्रयोग यशस्वी ठरला होता. त्याच धर्तीवर आता महामार्गावरील कृषी मॉल्स हा पुढचा मोठा टप्पा मानला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पासाठी प्राथमिक स्तरावर हालचाली सुरू केल्या असून, लवकरच राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या टोल नाक्यावर ही सुविधा उभारली जाणार आहे.



