जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुलांना वाचनाची गोडी लागावी आणि डिजिटल ज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने ‘सुधर्मा’ संस्थेच्या वतीने मन्यारखेडा येथे मोफत बाल वाचनालय व संगणक प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमामुळे झोपडपट्टीतील व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
मन्यारखेडा येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या उपपोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्या हस्ते सकाळी पार पडले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी त्यांचे स्वागत भगवद्गीतेची प्रत देऊन केले. कार्यक्रमात सुनीता बेलसरे, सूर्यकांत हिवरकर, सुवर्णा मराठे, भाग्यश्री नन्नवरे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना हेमंत बेलसरे यांनी लहानपणीच्या वाचन संस्कृतीच्या आठवणी सांगत, आजच्या डिजिटल युगात मुलांमध्ये वाचनाची आवड कमी होत चालल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळेच सुधर्मा संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी बाल वाचनालय सुरू करण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देऊन त्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपपोलीस निरीक्षक माधुरी बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलच्या अति वापरामुळे वाचन संस्कृती कमी होत असल्याचे सांगितले. त्यांनी मुलांना चांगली पुस्तके वाचून जीवनाचे ध्येय ठरवण्याचे आवाहन केले. तसेच मुलींसाठी ‘गुड टच-बॅड टच’ याबाबत जागरूकता निर्माण करत स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला. कोणतीही अनुचित घटना घडल्यास पालक किंवा पोलिसांना त्वरित माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारची संस्कारक्षम पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली असून, संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी मन्यारखेडा व खेडी खुर्द येथील सुमारे ५० विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. प्रवीण पुराणिक यांनी संगणक उपलब्ध करून देत उपक्रमाला सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णा मराठे, भाग्यश्री नन्नवरे आणि सुनीता बेलसरे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूर्यकांत हिवरकर यांनी आभार मानले.



