भुसावळ-इकबाल खान (स्पेशल रिपोर्ट ) । लोकनियुक्त नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे या अपात्र झाल्यानंतर उपनगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभार आल्यानंतर राजकीय वर्तुळातील घडामोडी गतीमान झाल्या असून आधीपासूनच कुंपणावरील भूमीका घेतलेले काही नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असून निवडणुकीआधी पक्षांतर होण्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
एस.सी. प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असलेल्या भुसावळ येथील लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गायत्री गौर भंगाळे यांनी निवडणुकीत विजय संपादन केला तरी त्या या पदाचा कारभार अल्प काळच पाहू शकल्या. २३ एप्रिल २०२६ रोजी जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध असल्याचे जाहीर केले. अलीकडेच राज्य सरकारने त्यांना नगराध्यक्षपदावरून अपात्र घोषीत केले आहे. गायत्री गौर-भंगाळे यांनी आधीच अपात्रतेला स्थगितीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही. आता या याचिकेवर सहा आठवड्यात निकाल लागणार आहे. तर या सर्व घडामोडींमध्ये उपनगराध्यक्षा शैलजा पुरूषोत्तम नारखेडे यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यभार आला आहे.

गायत्री भंगाळे यांच्या याचिकेवरील निकाल ही उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात जाऊन यासाठी विलंब लागू शकतो. तोवर, शैलजा नारखेडे या नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळणार असल्याने आता भाजप व शिवसेना युतीच्या सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. त्यांना सभागृहात निर्णायक बहुमत असल्याने आता तरी नगरपालिकेचे विविध प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे. तर, या गदारोळात कुंपणावर बसलेले काही सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
याआधीच्या पंचवार्षीकमध्ये काही विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी केल्याचे उघडपणे दिसून आले होते. आता याच्याच पुढचा अध्याय विद्यमान पंचवार्षीकमध्ये देखील होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचे एकूण ३१ नगरसेवक आहेत. तर अपक्ष व लहान पक्षांचे सदस्य आता सत्तेचा बदललेला रोख पाहून त्यांना सपोर्ट करण्याची शक्यता आहे. या गटाला भाजपमध्ये विलीन करून घेण्यासाठी ऑपरेशन लोटस राबविण्यात येण्याचे संकेत यातून मिळाले आहेत.
यामुळे सत्ताधाऱ्यांची ताकद वाढून नगरपालिकेत जनहिताची कामे करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तर पोटनिवडणुकीआधी भाजपमध्ये इनकमींग झाल्यास याचा भाजपच्या उमेदवाराला लाभ देखील होणार असल्याचे गणीत यातून मांडण्यात आले आहे.



