Home Cities अमळनेर एटीएम ठप्प; पीक कर्जासाठी शेतकरी वाऱ्यावर !

एटीएम ठप्प; पीक कर्जासाठी शेतकरी वाऱ्यावर !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील पीक कर्ज वाटप प्रक्रियेत पुन्हा एकदा गंभीर अडथळे निर्माण झाले असून एटीएममधून पैसे न मिळाल्याने शेतकरी अक्षरशः वाऱ्यावर पडले आहेत. मार्च महिन्यात मोठ्या कष्टाने रोखीने पीक कर्जाची परतफेड केलेल्या लाखो शेतकऱ्यांना आता नव्या कर्जासाठी एटीएमच्या फेर्‍या माराव्या लागत आहेत. मात्र मागील आठवड्यापासून एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना दिवसभर फिरूनही रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

शेतकऱ्यांची मागणी असताना देखील जिल्हा बँकेकडून कर्ज वाटप केवळ आयसीसी बँकेच्या एटीएमद्वारेच करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. मायक्रो एटीएम किंवा थेट शाखेमार्फत रोख रक्कम देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनेकांना ‘जानकार’ व्यक्ती सोबत घ्यावी लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्चही सहन करावा लागत आहे.

दरवर्षी याच समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत असतानाही प्रशासन आणि बँक व्यवस्थापनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत लीड बँक व्यवस्थापक सुनील देव्हारा यांच्याशी संपर्क साधला असता, जिल्ह्यात कॅश उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या कुटुंबात विवाहासारखी तातडीची कामे असल्याने त्यांना त्वरित पैशांची गरज आहे. अशा परिस्थितीत बँकेने किमान अर्धी रक्कम रोखीने देण्याचे दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

या प्रश्नावर तात्काळ तोडगा न काढल्यास किसान काँग्रेसच्या माध्यमातून बँकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रा. सुभाष पाटील यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound