अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अमळनेर येथील जयनिल फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत मदतकार्याचा मोठा उपक्रम राबविला आहे. पूरग्रस्त कुटुंबांना अन्नपदार्थ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण करून फाऊंडेशनने संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे केला आहे.
जयनिल फाऊंडेशनच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. पूरस्थितीमुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असताना त्यांना आवश्यक अन्नसामग्री आणि पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. या मदतकार्याचे नेतृत्व जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील आणि उपाध्यक्ष वरून पाटील यांनी केले. मदत योग्य व्यक्तींपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्यात आले. या उपक्रमात रोटरी क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर, जैन सोशल ग्रुप तसेच अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघ यांनी सक्रिय सहकार्य केले. विविध सामाजिक संस्थांच्या स्वयंसेवकांनी दिवसभर मदत वितरण व्यवस्थेत सहभाग घेतला. पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांना धीर देण्यात आला. अन्न आणि पाण्याच्या वितरणासोबतच पूरस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मदतकार्य करण्यात आले.

दरम्यान, गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयनिल फाऊंडेशनच्या टीमने पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीचा आढावा घेतला. काही ठिकाणी बचाव व स्वच्छता कामांसाठी जेसीबीसह इतर आवश्यक मशिनरी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे प्रभावित भागातील नागरिकांना मोठा आधार मिळाला. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी एकत्र येऊन केलेले हे मदतकार्य समाजातील एकोपा आणि संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे. जयनिल फाऊंडेशनसह सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, संकटाच्या काळात मिळालेली ही मदत पूरग्रस्तांसाठी आशेचा किरण ठरली आहे.



