Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘बायोक्वेस्ट २०२६’चा जल्लोष

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ‘बायोक्वेस्ट २०२६’चा जल्लोष

0
9

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वैद्यकीय शिक्षणातील जैवरसायनशास्त्र विषयाची समज अधिक भक्कम करण्यासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागाच्या वतीने प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी ‘बायोक्वेस्ट २०२६’ या बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये टीमवर्क, संवादकौशल्य आणि स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या जैवरसायनशास्त्र विभागाने ही स्पर्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित केली होती. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील जैवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश जांभुळकर, जैवरसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. निलीमा पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. प्रशांत सोळंके यांनी ‘बायोक्वेस्ट २०२६’ स्पर्धेतील नाविन्यपूर्ण संकल्पनेचे कौतुक केले.

प्रत्येक संघामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एका विद्यार्थ्याचा समावेश करण्यात आला होता. ही रचना समुदाय वैद्यकशास्त्राच्या भाषेत ‘डबल ब्लाइंडिंग’सारखी असून त्यामुळे कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न राहता स्पर्धेची पारदर्शकता आणि निष्पक्षता अधिक मजबूत झाली, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या आंतरमहाविद्यालयीन शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ विषयाचे सखोल ज्ञान मिळत नाही, तर एकत्रित काम करण्याची क्षमता, संवादकौशल्य आणि व्यावसायिक सहकार्याचे महत्त्वही समजते. ‘बायोक्वेस्ट २०२६’चे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी जैवरसायनशास्त्र विभागाचे अभिनंदन केले तसेच भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्पर्धेत एकूण चार संघांनी सहभाग घेतला. प्रत्येक संघामध्ये दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे एकूण आठ विद्यार्थ्यांनी बायोकेमिस्ट्री विषयातील आपल्या ज्ञानाचे आणि कौशल्याचे सादरीकरण केले.

प्रश्नोत्तरांच्या विविध फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी जैवरसायनशास्त्रातील संकल्पना, वैद्यकीय उपयोग आणि विषयाशी संबंधित महत्त्वपूर्ण बाबींवर प्रभुत्व दाखविले. प्रमुख पाहुणे डॉ. राजेश जांभुळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वैद्यकीय शिक्षणामध्ये बायोकेमिस्ट्री विषयाचे महत्त्व स्पष्ट केले. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते तसेच अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो, असे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेचे आयोजन जैवरसायनशास्त्र विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. निलीमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आयोजन समितीमध्ये डॉ. रणधीर कुमार पांडे, डॉ. दिप्ती कात्रे, डॉ. योगेश तायडे, डॉ. प्रकाश तिरुवा, डॉ. सुनील तेटांबे, डॉ. राशिका सक्सेना आणि डॉ. आयुष महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला डॉ. बापूराव बीटे, डॉ. पल्लवी बढे, डॉ. युवराज बढे, डॉ. ऋतुजा एस. बिर्हाडे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

‘बायोक्वेस्ट २०२६’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रथम क्रमांक टीम बी मधील आरुष गुप्ता आणि मधुरा युवराज बढे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक टीम सी मधील अर्जुन रमेश मांडवे आणि लक्ष्मी सुषमा देशमुख यांनी मिळविला. तृतीय क्रमांक टीम डी मधील आद्या आहुजा आणि शैलेश माणिक फेगडे यांनी पटकावला, तर चतुर्थ क्रमांक टीम ए मधील लक्षिता संजय जवांजळ आणि तनमय भैरवनाथ देशमुख यांनी मिळविला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील ‘बायोक्वेस्ट २०२६’ ही बायोकेमिस्ट्री क्विझ स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसोबतच आंतरमहाविद्यालयीन सहकार्य आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. या उपक्रमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासातील संकल्पना अधिक प्रभावीपणे समजून घेण्याची संधी मिळाली.


Protected Content

Play sound