जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कंबरदुखीसह डाव्या पायात तीव्र वेदना, मुंग्या आणि बधिरपणामुळे चालणेही कठीण झालेल्या ४८ वर्षीय रुग्णावर जळगाव येथील महादेव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये अत्याधुनिक दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेत केवळ दोन टाके घेण्यात आले असून, शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पायातील ताकद वाढली, वेदना व मुंग्या पूर्णपणे थांबल्या आणि दुसऱ्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासोबतच या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आला आहे.
हा ४८ वर्षीय पुरुष रुग्ण मागील एक महिन्यापासून कंबरदुखी आणि डाव्या पायात पसरणाऱ्या तीव्र वेदनांनी त्रस्त होता. कंबरदुखीपेक्षा डाव्या पायातील वेदना अधिक तीव्र होत्या. डाव्या पायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे तसेच अवघे १०० मीटर चालल्यानंतर चालण्यास त्रास होणे, अशा तक्रारी त्याला होत्या. वैद्यकीय तपासणीमध्ये डाव्या पायातील स्नायूंची ताकद कमी झाल्याचे निदर्शनास आले; विशेषतः घोटा आणि पायाच्या अंगठ्याची हालचाल करणाऱ्या स्नायूंची ताकद ३/५ इतकी कमी झाली होती. एमआरआय लंबर स्पाइन तपासणीत एल ४-एल ५ आणि एल ५-एस१ या दोन मणक्यांमधील डिस्क सरकल्याचे (पीआयव्हीडी – प्रोलॅप्स्ड इंटरव्हर्टेब्रल डिस्क) निदान झाले. त्यामुळे नसांवर दबाव निर्माण होऊन पायात वेदना, मुंग्या आणि स्नायूंची ताकद कमी होण्याचा त्रास होत होता.

रुग्णाची वैद्यकीय अवस्था लक्षात घेऊन महादेव हॉस्पिटलमध्ये लॅमिनेक्टॉमी आणि डिस्केक्टॉमीसह एंडोस्कोपिक डिकंप्रेशन (दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया) ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यात आली. या तंत्रज्ञानामुळे छोट्या छेदातून मणक्याच्या भागात पोहोचून नसांवरील दबाव कमी करणे आणि सरकलेली डिस्क काढणे शक्य झाले आणि शस्त्रक्रियेसाठी केवळ दोन टाके घेण्यात आले. ही शस्त्रक्रिया न्यूरोसर्जन डॉ. अनिकेत पाटील, डॉ. विपुल राठोड आणि डॉ. अतुल जाधव यांनी केली. त्यांना डॉ. श्रुती खंडागळे व डॉ. प्रीतम दास यांनी सहकार्य केले, तर भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. ब्रहाटे यांनी जबाबदारी सांभाळली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या डाव्या पायातील स्नायूंची ताकद वाढली असून, पायातील वेदना, मुंग्या आणि बधिरपणाचा त्रास पूर्णपणे थांबला. रुग्णाला चालण्यातही लक्षणीय सुधारणा जाणवली आणि प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाल्याने दुसऱ्याच दिवशी रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळाल्याने आर्थिक भाराविना रुग्णाला मोठा दिलासा मिळाला. लहान छेद, केवळ दोन टाके आणि जलद रिकव्हरी हे एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, मणक्याच्या आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी आधुनिक उपचारपद्धतीचा हा एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरत आहे, असे डॉ. विपुल राठोड यांनी सांगितले.
कंबरदुखी व डाव्या पायात तीव्र वेदना, मुंग्या आणि अशक्तपणामुळे चालणे कठीण झालेल्या ४८ वर्षीय रुग्णावर जळगावच्या महादेव हॉस्पिटलमध्ये दुर्बिणीद्वारे मणक्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. केवळ दोन टाक्यांत झालेल्या या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला असून, शासकीय योजनेतून उपचार मोफत करण्यात आले.



