Home क्राईम रुईखेडा शिवारात तस्करांचे जंगलराज! भरदिवसा वृक्षांची कत्तल, ग्रामस्थांचा संताप अनावर

रुईखेडा शिवारात तस्करांचे जंगलराज! भरदिवसा वृक्षांची कत्तल, ग्रामस्थांचा संताप अनावर

0
1

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात अवैध धंद्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसतानाच आता अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यातील रुईखेडा शिवारात भरदिवसा झाडांची कत्तल करून वाहनांमधून लाकूड सर्रासपणे दुसरीकडे रवाना केले जात असल्याची बाब समोर आली आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन काही व्यक्ती खुलेआम लाकूडतोड आणि वाहतूक करत असल्याचा आरोप होत असून, या प्रकारामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परजिल्ह्यातील काही व्यक्ती रुईखेडा शिवारात येऊन मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल करतात आणि त्यानंतर वाहनांमध्ये हे लाकूड भरून वाहतूक करतात. विशेष म्हणजे, ही तस्करी रात्रीच्या अंधारात नव्हे, तर भरदिवसा आणि अगदी उघडपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. इतक्या राजरोसपणे वृक्षतोड आणि लाकडाची वाहतूक होत असताना वनविभाग व संबंधित शासकीय यंत्रणांना याची कल्पना नाही का, की सर्व माहिती असूनही जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
झाडे हा पर्यावरणाचा अमूल्य ठेवा असताना केवळ पैशांच्या हव्यासापोटी नैसर्गिक व वनसंपत्तीची अशी लूट होत असेल, तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वृक्षतोडीसाठी संबंधित व्यक्तींकडे वनविभागाची आवश्यक परवानगी आहे का, वाहनांमधून लाकडाची वाहतूक करताना वाहतूक परवाना व कागदपत्रांची तपासणी होते का आणि परजिल्ह्यातून येऊन येथे कारवाया करणाऱ्यांची चौकशी कोण करणार, असे अनेक अनुत्तरित प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.
रुईखेडा शिवारातील या प्रकाराची वनविभाग आणि महसूल प्रशासनाने तातडीने गंभीर दखल घेऊन घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अवैध वृक्षतोड करणारे, लाकडाची वाहतूक करणारे वाहनचालक आणि या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याची सखोल चौकशी करून संबंधित वाहने जप्त करावीत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने या प्रकरणात त्वरित ठोस पावले न उचलल्यास लाकूड तस्करांचे मनोबल आणखी वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील रुईखेडा शिवारात परजिल्ह्यातील व्यक्तींकडून भरदिवसा अवैध वृक्षतोड करून वाहनांमधून लाकडाची तस्करी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वनसंपत्तीची लूट रोखण्यासाठी वनविभाग व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून तस्करांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Protected Content

Play sound