Home आरोग्य भुसावळमध्ये महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शेकडो महिलांनी घेतला...

भुसावळमध्ये महिला आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त शेकडो महिलांनी घेतला लाभ

0
7

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती, तपासणी आणि तज्ज्ञ वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी भुसावळ येथे आयोजित विशेष महिला आरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव आणि श्री संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्या व तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

शिबिराचे उद्घाटन शनिवारी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, सामाजिक कार्यकर्त्या रजनी सावकारे, आरोग्य सभापती मेघा वाणी, वैद्यकीय अधिकारी संदीप जैन आणि तौसिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रसूती व स्त्रीरोग विभागातील तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध समस्यांवर या शिबिरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. गर्भाशयाशी संबंधित आजार, गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता, स्तनातील गाठींची तपासणी, गर्भवती महिलांसाठी आयर्न सुक्रोज इंजेक्शनचे महत्त्व तसेच स्तनपानाचे फायदे याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय महिलांच्या इतर आरोग्यविषयक तक्रारींवरही प्राथमिक तपासणी करून आवश्यक उपचारांसाठी सल्ला देण्यात आला.

शिबिरात अनेक महिलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांनी योग्य उपचारपद्धतीबाबत मार्गदर्शन केले. महिलांनीही आपल्या आरोग्याशी संबंधित समस्या डॉक्टरांसमोर मांडत शिबिराचा लाभ घेतला.

जागतिक स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मातांसाठी विशेष समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले. नवजात बालकांसाठी स्तनपानाचे महत्त्व, जन्मानंतर पहिल्या सहा महिन्यांपर्यंत केवळ स्तनपान देण्याचे फायदे तसेच माता आणि बालकांच्या आरोग्यासाठी स्तनपानाची महत्त्वपूर्ण भूमिका याबाबत माहिती देण्यात आली. मातांनी स्तनपानासंदर्भातील प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

महिलांनी आपल्या आरोग्याच्या समस्या दुर्लक्षित न करता वेळेत तपासणी करून घेणे आवश्यक आहे. विशेषतः स्तनातील गाठी, गर्भाशयाशी संबंधित त्रास, गर्भावस्थेतील समस्या किंवा इतर स्त्रीरोगविषयक लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले. १ ते १० ऑगस्टदरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. त्यामुळे भुसावळ परिसरातील अधिकाधिक महिलांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या महिला रुग्णांसाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे सवलतीच्या दरात उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सुविधेबाबत अधिक माहितीसाठी दिक्षा सुरे – ९६८९६८०९०१ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

 


Protected Content

Play sound