Home धर्म-समाज राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पांडुरंगाच्या चरणी...

राज्यातील दुष्काळाचे संकट दूर होऊ दे ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

0
1

पंढरपूर/वरणगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठलाच्या चरणी केली. कार्तिकी यात्रा २०२६ च्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांनी सपत्नीक संपन्न केली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.

कार्तिकी यात्रेनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. संपूर्ण पंढरपूर नगरी सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाली असून, वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाने वातावरण भारावले आहे. या यात्रेत सामान्य वारकऱ्यांना श्री विठ्ठलाचे दर्शन कमी वेळेत आणि सुलभतेने घेता यावे, यासाठी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाला असून, सर्वसामान्य भाविकांना लवकर दर्शन घेता येत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. वारीच्या नियोजनासंदर्भात प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवण्यात आला होता. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. कार्तिकी यात्रेदरम्यान भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने केलेल्या कामाचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले.

राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप आणि रब्बी हंगामात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, पिकांचेही नुकसान झाले आहे. या कठीण परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊन त्यांच्या जीवनात पुन्हा सुख-समाधानाचे दिवस यावेत, अशी प्रार्थना आपण पांडुरंगाकडे केल्याचे त्यांनी नमूद केले.  शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. दिवाळीच्या काळात सरकारच्या वतीने आर्थिक मदतीचे वितरण तत्परतेने करण्यात आले असून, दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध सवलतींची घोषणाही करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे काम सरकारकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी आणि कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहे. भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंढरपूर कॉरिडॉरच्या कामाबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. हे काम सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊनच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांच्या भावना आणि स्थानिक घटकांचा विचार करून विकासकामे पुढे नेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.


Protected Content

Play sound