जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खरीप हंगाम २०२६ पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे, खते व किटकनाशकांच्या पुरवठ्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी जळगाव जिल्ह्यात कृषि निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशकांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या काळात काळाबाजार, साठेबाजी किंवा निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांचा पुरवठा होण्याच्या तक्रारी येत असल्याने प्रशासनाने हा कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून उत्पादन, वितरण आणि विक्री प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.

नियंत्रण कक्षामार्फत शेतकरी, कंपनी प्रतिनिधी तसेच विक्रेते यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींचे तात्काळ निराकरण केले जाणार आहे. हा कक्ष दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यरत राहणार आहे. यासाठी ७५८८०१३३९३ व ९९८५२१९००५ या मोबाईल क्रमांकांवर तसेच ०२५७-२२३९०५४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय १८००२३३४००० हा टोल-फ्री क्रमांक आणि saojalgaon@gmail.com व zpjalgaonado@gmail.com या ई-मेलद्वारेही तक्रारी नोंदवता येणार आहेत.
या नियंत्रण कक्षात मोहिम अधिकारी अविनाश खैरनार व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे हे अधिकारी कार्यरत असून ते तक्रारींचे निवारण करणार आहेत. जिल्हा प्रशासनाने शेतकरी व संबंधित घटकांनी कोणतीही अडचण भासल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
खरीप हंगाम सुरळीत पार पडावा, शेतकऱ्यांना वेळेवर आणि दर्जेदार निविष्ठा मिळाव्यात यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.



