Home Cities जळगाव वारस हक्काच्या नोकऱ्या रखडल्या; जळगाव महापालिकेतील लाभार्थ्यांचा उपमहापौरांकडे धाव

वारस हक्काच्या नोकऱ्या रखडल्या; जळगाव महापालिकेतील लाभार्थ्यांचा उपमहापौरांकडे धाव

0
66

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेतील वारस हक्काच्या नोकरीसाठी पात्र लाभार्थ्यांना अद्याप नियुक्ती न मिळाल्याने संबंधित लाभार्थ्यांनी उपमहापौर मनोज चौधरी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने नियुक्ती देण्याची मागणी केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ३० दिवसांच्या आत नियुक्ती देणे बंधनकारक असतानाही अनेक महिन्यांपासून प्रक्रिया रखडल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.

उपमहापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार वारस हक्काने नियुक्तीची प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण होणे आवश्यक आहे. संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण केली असतानाही अद्याप नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, अनेक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती अथवा निधनानंतर त्यांच्या वारसांना नियमानुसार नोकरी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नियुक्ती प्रक्रिया लांबत असल्याने अनेक लाभार्थ्यांना ना वारस हक्काची नोकरी मिळाली आहे, ना इतर शासकीय लाभांचा लाभ मिळत आहे. परिणामी संबंधित कुटुंबांना उपासमारीची वेळ आल्याचा दावा करण्यात आला आहे.

लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमांनुसार वारस हक्काची नियुक्ती तातडीने देण्यात यावी, तसेच प्रलंबित पेन्शन आणि इतर आर्थिक लाभही तत्काळ मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी निवेदनातून केली आहे. प्रशासनाने या प्रकरणात विलंब न करता निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या निवेदनावर विजय हिरालाल कागडे, जितेंद्र चरण सारवान, रविन लक्ष्मण ढेडवाल , कपिल किशोर सकत,रनजीत प्रकाश सनकत, माधुरी विक्की हंसकर, ललित हिरालाल कागडे, धीरज शिवप्रकाश ढंढोरे, राजतिलक जगन चनाल यांच्यासह लाभार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वारस हक्काच्या नियुक्तीचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाच्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.


Protected Content

Play sound