


नशिराबाद- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नशिराबाद नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा पंधरवाड्या’तील विविध कल्याणकारी उपक्रमांना अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून नशिराबाद शहरात आजपासून अधिकृतपणे प्लास्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, खासदार स्मिता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्लास्टिकमुक्तीची आणि पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ देण्यात आली.
या प्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना खासदार स्मिता वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीचा गौरव केला. पंतप्रधान मोदी यांनी नेहमीच तळागाळातील सामान्य जनतेच्या कल्याणाला प्राधान्य दिले आहे. पक्षातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे स्थानिक प्रश्न जाणून घ्यावेत आणि ते तात्काळ सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असा त्यांचा नेहमीच संदेश असतो. त्याच सेवाभावी वृत्तीने आणि प्रेरणेने नशिराबाद शहरात या सेवा पंधरवाड्याच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.
नगरपरिषदेने शहराला कचरामुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या दृष्टीने आजपासून प्लास्टिकबंदीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या जनजागृती कार्यक्रमासाठी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी, नागरिक, तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी भविष्यात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचा आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा ठाम संकल्प केला. या उपक्रमात उपविभागीय अधिकारी योगेश मीना, नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, प्रभारी नगराध्यक्ष पंकज महाजन, सभापती कीर्तीकांत चौबे, नगरसेवक लालचंद पाटील, नगरसेविका शैला व्यवहारे, नगरसेवक सय्यद वासिफ, नगरसेवक अस्लम तनवीर, नगरसेविका लीना महाजन, भारताबाई धनगर, नगरसेवक मनोज पाटील, नगरसेवक प्रदीप बोढरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. सेवा पंधरवाड्याच्या या कालावधीत शहरात स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी, सामाजिक जनजागृती आणि लोकसहभागाशी संबंधित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. नशिराबाद शहर पूर्णपणे प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि हरित करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगरपरिषदेला प्रशासकीय पातळीवर पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.



