Home Cities यावल यावलमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस; कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू – बजरंग दलाचा...

यावलमध्ये मोकाट जनावरांचा हैदोस; कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू – बजरंग दलाचा इशारा

0
5

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बजरंग दलाच्या वतीने मुख्याधिकारी निशिकांत गवई यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

बजरंग दलाचे यावल तालुका संयोजक राजेंद्र बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकाट गुरे फिरत आहेत. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीस्वार, पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

निवेदनात काही दिवसांपूर्वी सांगवी येथे विजेचा धक्का लागून दोन जनावरांचा मृत्यू झालेल्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. बजरंग दलाने नगर परिषदेसमोर सहा प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. शहरातील सर्व मोकाट जनावरांची नोंद करून त्यांचा बंदोबस्त करावा, मालकीच्या जनावरांना ओळख पटण्यासाठी टॅग लावण्यात यावेत, जनावरांच्या मालकांना नोटीस देऊन जनावरे गोठ्यात ठेवण्याचे आदेश द्यावेत, नोटीसनंतरही जनावरे रस्त्यावर आढळल्यास संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करावी, बेवारस जनावरांना तातडीने गोशाळेत दाखल करण्याची व्यवस्था करावी तसेच विजेचे खांब, तारा आणि धोकादायक ठिकाणांची तपासणी करून जनावरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

याशिवाय शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसह गोमातेचे संरक्षण हे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे नमूद करत, मागण्यांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास बजरंग दलाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यास सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी बजरंग दलाचे यावल तालुका संयोजक राजेंद्र बडगुजर यांच्यासह भाजपच्या नगरपालिकेच्या गटनेत्या सौ. नंदा महाजन, हेमंत बडगुजर, ईश्वर माळी, प्रसाद बिरारी, गोपाळ बैरागी, पंकज चौधरी, निशू भोईटे, कृष्णा रोहम तसेच बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound