Home Uncategorized जिल्हा क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चा आंदोलनाचा इशारा

जिल्हा क्रीडा संकुल सर्वांसाठी मोफत करा; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चा आंदोलनाचा इशारा

0
4

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू तसेच सकाळ-सायंकाळ व्यायाम व मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांकडून आकारण्यात येणारे मनमानी शुल्क तात्काळ रद्द करून क्रीडा संकुलातील सर्व सुविधा नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पक्षाने दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा क्रीडा संकुल दुरुस्तीच्या कारणास्तव विविध खेळांच्या खेळाडूंसाठी तसेच मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या शहरवासीयांसाठी बंद ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात गेल्या सहा महिन्यांपूर्वीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र उद्घाटनाच्या राजकीय कारणांमुळे क्रीडा संकुल सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात विलंब करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विविध स्पर्धांची तयारी करणाऱ्या खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे प्रशासनाला क्रीडा संकुल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

क्रीडा संकुल सुरू झाल्यानंतर देखभालीसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने वार्षिक ९ हजार ते ५६ हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय केवळ सकाळी किंवा सायंकाळी चालण्यासाठी व व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही प्रतितास ५० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही शुल्क आकारणी सर्वसामान्य नागरिक, खेळाडू आणि विविध आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्तींवर अन्याय करणारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.

निवेदनात जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीवर पाच ते सहा कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा उल्लेख करत या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण कामाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. क्रीडा संकुलातील मैदाने व इतर उपलब्ध सुविधा सर्व खेळाडू आणि शहरवासीयांसाठी विनामूल्य खुल्या करण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी पक्षाने केली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)च्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या वेळी महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, युवक प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते गोपाळराव पाचवणे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुलातील शुल्कवाढीच्या निर्णयाविरोधात खेळाडू आणि नागरिकांमध्ये नाराजी असून, मनमानी शुल्क रद्द करून सर्वांसाठी क्रीडा सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे. प्रशासनाने या मागणीची दखल घेत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound