Home उद्योग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची वीजचोरीविरोधात मोहीम ; नशिराबादमध्ये मोटारसायकलवरून दवंडी!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची वीजचोरीविरोधात मोहीम ; नशिराबादमध्ये मोटारसायकलवरून दवंडी!

0
2

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणच्या नशिराबाद शहर कक्षातर्फे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मोटारसायकलवर लाऊडस्पीकर लावून गावातील विविध भागांत दवंडी देण्यात आली. वीजचोरीचे दुष्परिणाम, कायदेशीर कारवाई आणि अधिकृत वीजजोडणीचे महत्त्व याबाबत ग्रामस्थांना माहिती देत वीजचोरी न करण्याचे आवाहन करण्यात आले.

दिवाळीच्या काळात घरांमध्ये तसेच व्यावसायिक आस्थापनांमध्ये विजेचा वापर वाढतो. या पार्श्वभूमीवर अनधिकृत वीजवापर आणि वीजचोरीसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी महावितरणने हा उपक्रम हाती घेतला. मोटारसायकलवर ध्वनिक्षेपक बसवून गावातील प्रमुख रस्ते, चौक आणि विविध वस्त्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. या वेळी वीजचोरी करणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असल्याचे ग्रामस्थांना सांगण्यात आले. अनधिकृतपणे वीज वापरणे, वीजजोडणीमध्ये परवानगीशिवाय बदल करणे अथवा अन्य मार्गांनी वीजचोरी करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले. वीजचोरी करताना कोणी आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आला.

महावितरणचे सहाय्यक अभियंता पवन सुधाकर वाघुळदे यांच्या पुढाकाराने नशिराबाद शहर कक्षाच्या वतीने हा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. सणासुदीच्या काळात वीजचोरीसारख्या गैरप्रकारांना प्रतिबंध करणे, अधिकृत वीजवापराला प्रोत्साहन देणे आणि नागरिकांमध्ये वीज कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. ग्रामस्थांनी केवळ अधिकृत वीजजोडणीद्वारेच विजेचा वापर करावा, नियमितपणे वीजबिल भरावे आणि वीजचोरीमुक्त नशिराबाद गाव निर्माण करण्यासाठी महावितरण प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


Protected Content

Play sound