
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील कत्तलखान्याचा अनेक दिवसांपासून सुरू असलेला प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. नगरपालिकेच्या विशेष सभेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करण्याचा आणि त्याची इमारत पाडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात कत्तलखान्याची इमारत जमीनदोस्त केली. या कारवाईनंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हिंदू संघटनेच्या वतीने सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.

अमळनेर शहरातील कत्तलखान्याच्या प्रश्नावर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि गोरक्षक हिंदू संघटनेने तीव्र भूमिका घेत आंदोलन सुरू केले होते. या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाच्या माध्यमातून कत्तलखाना बंद करून तो हटविण्याची मागणी केली होती. आंदोलनातून व्यक्त झालेल्या नागरिकांच्या भावना आणि मागण्यांची दखल घेत माजी आमदार शिरीष चौधरी तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नेतृत्वाखालील नगरपालिकेच्या कार्यकारिणीने या विषयावर निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली. या पार्श्वभूमीवर २८ नोव्हेंबर रोजी नगरपालिकेची तातडीची विशेष सभा घेण्यात आली. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नागरिकांच्या भावनांचा सन्मान राखून निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, गटनेते पंकज चौधरी, अध्यक्ष गटनेते महेश देशमुख, साहेबराव पवार, अनिल महाजन, दीपक चौपुले, सविता संदानशिव, अर्चना चौधरी, कैलास पाटील, सुवर्णा हटकर, श्रीराम चौधरी, सुयोग धनगर, रामकृष्ण पाटील, छाया बाळू पाटील, नीलिमा पाटील, कल्पना परदेशी, स्वाती परदेशी, सचिन कासार, प्रवीण पाटील, सचिन पाटील, स्वप्ना पाटील, भरत ललवाणी आणि विजय पाटील या नगरसेवकांच्या सहभागातून ठराव क्रमांक २०२ मंजूर करण्यात आला. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक अधिनियम १९६५ मधील कलम १६६ (२) नुसार कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करून त्याची इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर मुख्याधिकारी रोशन राजपूत यांनी अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी जनार्दन पवार यांनीही अमळनेर येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. संभाव्य तणावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड आणि नामदेव बोरकर यांच्यासह सात अधिकारी व ६५ पोलिसांच्या उपस्थितीत कत्तलखान्याची इमारत पाडण्यात आली. नगरपालिकेने आंदोलनकर्त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत प्रत्यक्ष कारवाई केल्यानंतर संबंधित हिंदू संघटनांनी आपले उपोषण मागे घेतले. या घडामोडीनंतर शहरात समाधान आणि शांततेचे वातावरण असल्याचे चित्र दिसून आले. आंदोलन, प्रशासकीय कागदपत्रांची पडताळणी, कायदेशीर सल्ला आणि नगरपालिकेच्या विशेष सभेतील ठराव अशा टप्प्यांतून हा प्रश्न मार्गी लागला. या कारवाईच्या वेळी खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



