
छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार, समीक्षक आणि विचारवंत डी. बी. जगत्पुरिया यांना इंडोनेशियातील बाली येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात प्रतिष्ठेचा ‘आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक योगदानाची आणि साहित्यसेवेची दखल घेत हा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या गौरवामुळे साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बाली येथे आयोजित या ऐतिहासिक सातव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विचारवंत जगन कराड होते. लेखिका आणि विचारवंत अंदिनी रिस्फदिनी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष प्राचार्य वैशाली प्रधान यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. विविध क्षेत्रांतील साहित्यिक, विचारवंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा साहित्यिक सोहळा पार पडला.
डी. बी. जगत्पुरिया यांनी साहित्य क्षेत्रात विविध साहित्यप्रकारांतून मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे अनेक कथासंग्रह, काव्यसंग्रह, कादंबऱ्या, लेखसंग्रह आणि समीक्षाग्रंथ प्रकाशित झाले आहेत. साहित्यनिर्मितीबरोबरच त्यांनी साहित्यिक चळवळींमध्येही सक्रिय सहभाग नोंदविला आहे. अस्मितादर्श संमेलनासह अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्यांच्या या एकूण साहित्यिक कार्याचा आणि साहित्यसेवेचा गौरव म्हणून त्यांना ‘आंतरराष्ट्रीय प्रज्ञा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या संमेलनात डॉ. गुरुस्वामी, डॉ. पुरण मेश्राम, भीमराव वाघमारे, डॉ. नागनाथ पाटील, डी. बी. जगत्पुरिया आणि डॉ. गंगाधर कायंदे पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संमेलनाच्या प्रारंभी अॅड. भूपेश पाटील यांनी संमेलनाची रूपरेषा मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल काळबांडे यांनी केले.



