जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एअरपोर्ट परिसरातील ‘तारा बिझनेस पार्क’ भागात असलेल्या रुबी पेंट्स कंपनीत झालेली मोठी घरफोडी उघडकीस आणण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा भागातील एका आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११ लाख ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फिर्यादी मोईज अब्बास बोहरा यांची एअरपोर्ट परिसरात रुबी पेंट्स नावाची कंपनी असून ते त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी बोहरा कुटुंबीय बाहेरगावी गेले असता, दि. १५ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाची नियुक्ती केली. तपासादरम्यान तांत्रिक माहितीच्या आधारे ही टोळी मध्य प्रदेशातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली. पथकाने तातडीने मध्य प्रदेश गाठले. तेथील चाचरीया पाटी आणि खरगोन परिसरात पोलिसांनी वेशांतर करून आरोपींवर पाळत ठेवली आणि मोठ्या शिताफीने ६ जणांना ताब्यात घेतले.
अटक केलेले आरोपी:
१) निलेश उर्फ भुऱ्या माहेरीया डुडवे (रा. धावडा) २) ताराचंद पठाण सोलंकी ३) सायसिंग राकेश सोलंकी ४) रविंद्र छोटू आर्य ५) दिलीप मंगा डुडवे ६) ग्यारशीलाल मगन अलावे (सर्व रा. चाचरीया पाटी, जि. बडवानी, मध्य प्रदेश)
हस्तगत केलेला मुद्देमाल:
पोलिसांनी आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
-
सोन्याचे दागिने व लगड: ३९ ग्रॅम (किंमत ५,४७,५००/- रुपये)
-
चांदीचे दागिने: ९९ ग्रॅम (किंमत २५,०००/- रुपये)
-
रोख रक्कम: ५,७८,०००/- रुपये
-
एकूण किंमत: ११,०५,५००/- रुपये
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोउनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने (प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, मोतीलाल बोरसे, विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे) यशस्वीरीत्या पार पाडली.



