आमदार जावळेंची मोहिम राजकीय स्वार्थासाठी- शिरीष चौधरींचा आरोप

यावल प्रतिनिधी । आमदार हरीभाऊ जावळे यांची जलसंवर्धनाची मोहिम ही राजकीय स्वार्थासाठी असल्याचा आरोप माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केला आहे. यावल-रावेर तालुक्यात आधीच व्यापक प्रमाणावर ही मोहीम सुरू असून जावळे यांचे श्रेय लाटणार असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे.

झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा हेतू

आमदार हरीभाऊ जावळे यांनी यावल-रावेर तालुक्यातील जल संवर्धनासाठी मोहिम सुरू करण्याची घोषणा केली आहे. याच्या पूर्वसंध्येला माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. या प्रसंगी शिरीष चौधरी म्हणाले की, गेली काही वर्ष रावेर-यावल परिसरात पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकरी व शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे जलसंधारणाची कामे होणे अत्यंत आवश्यक आहे.त् या दृष्टीने संतांच्या आशीर्वादासह आमदार हरीभाऊ जावळे यांनी हाती घेतलेल्या या कार्यक्रमाचे आम्ही स्वागत करतो व त्यांची तयारी असेल तर त्यात आम्ही सहभागी ही होवु. कारण जनहिताच्या प्रत्येक कार्यात कुठलाही अभिनिवेश न ठेवता सहभाग घेण्यासाठी आम्हा यावल व रावेर तालुक्यातील कार्यकर्त्यांची आणी जनसामान्यांचीही तयारी असते. मात्र गत दोन ते तीन वर्षापासुन यावल रावेर परिसरातील अनेक गावातील लोक स्वयंस्फुर्तीने जलसंधारणाची कामे करीत आहेत. हरीपुरा, कोरपावली, वड्री, परसाडे, कोळवद,डोंगर कठोरा, सांगवी, बोरखेडा , मारूळ, न्हावी, खिरोदा, चिंचाटी, जानोरी, सावखेडा, लोहारा, कुसुंबा, आभोडा, मुंजलवाडी, केर्‍हाळे, मंगरूळ, अहीरवाडी, पाल, मोह मांडली, निंभोरा, अशा अनेक गावांत स्थानीक शेतकर्‍यांनी नाला खोलीकरण, नदीपात्रात बांध घालणे, नदीपात्र नागरणे, चर खोदणे अशी कामे केलेलीच आहेत. तेच काम आता आमदार करू पाहत आहेत. त्या मुळे त्यांच्या हेतु बद्दल संशय वाटतो व झालेल्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा हेतु आहे असे दिसुन येते.

पाठपुरावा नाही

माजी आमदार शिरीष चौधरी पुढे म्हणाले की, गेली साडेचार वर्ष आमदारांनी या संदर्भात लोकप्रतिनिधी या नात्याने काहीही पावले उचललेली आहेत का? अथवा विधानसभेत यासंदर्भात चर्चा केली आहे का? तसे केले असल्यास सरकारकडून काय प्रतिसाद मिळाला त्यांनी सांगावे. आता विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे परिस्थितीचा राजकीय लाभ उचलण्यासाठी त्यांची ही धडपड आहे असे जाणवते कारण ते सत्ताधारी आमदार आहेत, त्यांनी पाण्याची परिस्थिती पाहता शासकीय यंत्रणा कार्यान्वित करून जलसंधारणासाठी शासना कडुन निधी मंजुर करून आणला पाहीजे होता, त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करायला पाहीजे होता. मात्र तसे झाले नाही.

शेळगाव बॅरेजची घोषणा हवेत

शिरीष चौधरी पुढे म्हणाले की, तिन वर्षापुर्वी आमदार हरीभाऊ जावळे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन यांनी आपल्या आवेशपुर्ण उत्साहात शेळगाव बॅरेजचे काम डिसेंबर २०१७ पर्यंत होईल अशी घोषणा केली होती. आता तीन वर्षे गेलीत तरी देखील शेळगाव बॅरेजचे काम अद्यापही फळाला आलेले नाही. हे सर्व आपण उघडया डोळयांनी पाहात आहोत. तसे काहीही न करता आमदार हरीभाऊ जावळे फक्त प्लड कॅनाल बद्दलच बोलत राहीले. या योजनेची आपल्याला गरज आहेच पण ती हजारो कोटींची योजना असल्याने त्या साठी निधी उपलब्ध होण्यासाठी व ती योजना कार्यान्वित व्हायला खुप अवधी लागणार आहे. तसेच फ्लड कॅनालचा विषय निवडणुका जवळ आल्यावर चर्चेला जातो नंतर बासनात गुंडाळला जातो गरज आहे ती गावपातळीवर जलसंधारणाची कामे तातडी ने होण्याची. त्याकडे आमदारांनी आज पर्यंत किती लक्ष दिले? किती निधी शासनाकडुन आणला याचा हिशोब देण्याची गरज आहे.

आत्मविश्‍वास गमावल्याचे लक्षण

माजी आमदार चौधरी पुढे म्हणाले की, यावल तालुक्यातील नागादेवी तलावाच्या कामासाठी अखेर ९३ वर्ष वयाच्या वयोवृद्ध शेतकरी व इतर शेतकर्‍यांना ४ दिवस आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली होती, तो पर्यंत आमचे आमदार स्वस्थ बसुन होते. मतदारसंघातील पाझर तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे अशी कामे अग्रक्रमाने घ्यायला पाहीजे होते पण ती झालेली नाही व का झाली नाहीत ?जलसंधारणासाठी संबंधीत गाव लोक व अधिकारी यांच्या किती बैठका त्यांनी घेतला ज्या गावांनी आजपर्यंत स्वयंस्फुर्तीने जलसंधारण चळवळ राबविली त्या सर्व गावाचे संबंधीत लोकांना सोबत घेवुन, त्यांच्याशी विचार विनिमय करून थेंब अमृताचा हा कार्यक्रम निश्‍चित केला असता तर विश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले असते, पण आमदार हरी भाऊ जावळे यांनी तसे केले नाही, त्याउलट ते फक्त स्व:ताच्या फाउंडेशनमार्फत जलसंधारण करण्याची घोषणा करून या पुर्वी गावोगाव झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा आमदार हे प्रयत्न करीत आहेत अशी शंका निर्माण होण्यास वाव आहे किंवा हे जनतेचा विश्‍वास आणी आत्मविश्‍वास गमावल्याचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल.

धडपडीचा निषेध

पत्रकार परिषदेच्या शेवटी माजी आमदार शिरीष मधुकराव चौधरी हे म्हणाले की आमचा विरोध जलसंधारण कामाला नाही कारण ते समाजहिताचे काम आहे. श्रेय लाटण्याच्या केविलवाण्या धडपडीचा मात्र आम्ही निषेध करतो. सर्वसामान्य माणुस हा आता दुधखुळा न राहता जागृत झालेला आहे. त्याला मुर्ख बनविणे शक्य नाही. त्यामुळे आमदारांनी तसा प्रयत्न करू नये. उलटपक्षी सर्वांना विश्‍वसात घेवुन, शासकीय निधी मिळवुन जलसंधारण कामाला गती देण्याची गरज आहे. त्यात आम्ही आपल्या सोबत सहभागी होण्यास तयार आहोत असे त्यांनी सांगीतले.

यांची होती उपस्थिती !

या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, रावेर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन, यावल पंचायत समितीचे विरोधी पक्ष गटनेता शेखर सोपान पाटील, रावेर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजीव रघुनाथ पाटील आणी रावेर पं.स. चे सदस्य योगेस सोपान पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Add Comment

Protected Content