
बंगळुरू-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । कर्नाटकच्या राजकारणात मोठा बदल घडला असून उपमुख्यमंत्री D. K. Shivakumar यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता ते राज्याचे 24 वे मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी बंगळुरूमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. माजी मुख्यमंत्री Siddaramaiah यांनी स्वतः शिवकुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, तर गृहमंत्री G. Parameshwara यांनी त्याला अनुमोदन दिले. सर्व आमदारांनी एकमताने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

काँग्रेस नेते Randeep Singh Surjewala आणि पक्षाचे संघटन महासचिव K. C. Venugopal हे बैठकीला निरीक्षक म्हणून उपस्थित होते. बैठकीदरम्यान काही वेळ वरिष्ठ नेत्यांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली आणि त्यानंतर शिवकुमार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.
राज्यातील सत्तांतर ‘मुख्यमंत्री रोटेशनल फॉर्म्युला’ अंतर्गत होत असल्याची चर्चा आहे. सिद्धरामय्या यांनी मे 2023 पासून 28 मे 2026 पर्यंत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. आता उर्वरित कार्यकाळासाठी शिवकुमार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. 3 जून रोजी बंगळुरूतील लोक भवनच्या ‘ग्लास हाऊस’मध्ये शपथविधी होण्याची शक्यता असून त्याचवेळी मंत्रिमंडळातही मोठे फेरबदल होऊ शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या मंत्रिमंडळातील जवळपास 10 मंत्र्यांना वगळले जाऊ शकते, तर चार उपमुख्यमंत्री नेमण्याचाही विचार सुरू आहे.
नवे मुख्यमंत्री होऊ घातलेले डी.के. शिवकुमार हे देशातील श्रीमंत राजकारण्यांपैकी एक मानले जातात. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे तब्बल 1413 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता आहे. रिअल इस्टेट, हॉटेल आणि खाण व्यवसायातही त्यांचा मोठा सहभाग आहे. मात्र एवढ्या संपत्तीसोबतच त्यांच्यावर सुमारे 263 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचीही नोंद आहे.
1962 मध्ये कनकपुरा येथे जन्मलेले शिवकुमार वोक्कालिगा समाजाचे प्रभावी नेते मानले जातात. काँग्रेसमधील संकटमोचक अशी त्यांची ओळख आहे. पक्षातील आमदार एकत्र ठेवणे, निवडणूक व्यवस्थापन, प्रचार रणनीती आणि संघटनात्मक ताकद वाढवण्यात त्यांचा मोठा प्रभाव राहिला आहे. दरम्यान, शिवकुमार यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयकडून काही प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे. 2019 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांना अटक झाली होती आणि जवळपास 50 दिवस त्यांना Tihar Jail मध्ये राहावे लागले होते. यामुळे त्यांचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. याचदरम्यान शिवकुमार यांचे ज्योतिषी द्वारकानाथ गुरुजी यांनीही मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डीके शिवकुमार हे दीर्घकाळ मुख्यमंत्री राहतील आणि 2028 च्या विधानसभा निवडणुकांनंतरही पुन्हा सत्तेत येऊ शकतात.
कर्नाटकच्या राजकारणातील या बदलामुळे राज्यातील काँग्रेसची पुढील रणनीती काय असेल, मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळेल आणि शिवकुमार मुख्यमंत्री म्हणून कोणते निर्णय घेतात याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.



