
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एकीकडे महायुतीचा उमेदवार ठरला नसतांना दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठा पक्षाचे नगरसेवक शरद शामराव तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यतल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठी महायतीतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला असून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. अद्यापही ही जागा कुणाला सुटणार ? की दोन्ही मित्रपक्ष मैत्रीपूर्ण लढणार ? याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीत झालेल्या चर्चेनुसार ही जागा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने जळगाव महापालिकेतील पक्षाचे स्वीकृत नगरसेवक तथा पक्षाचे महानगराध्यक्ष शरद शामराव तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. २००३ पासून ते व त्यांच्या सौभाग्यवती २०१७ पर्यंत लागोपाठ चारदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तर यंदाच्या महापालिका निवडणुकीत मात्र त्यांच्या सौभाग्यवतींना पराभवाचा धक्का बसला होता. निकालानंतर पक्षाने त्यांना स्वीकृत नगरसेवकाची संधी दिली होती. आता त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे.
यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने ते विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून आपण सोमवारी अर्ज भरणार असल्याची माहिती दिली आहे.



